शनिवार, १३ एप्रिल, २०१३

Yogasan योगासन


योगासन

योगासन हे योगाभ्यासातील सर्वात लोकप्रिय अंग ठरले आहे. योगासनांमुळे शरीर चपळ, लवचिक व शक्तिशाली बनते. मन स्थिर, शांत व एकाग्र  होते; हे लाभ आज सर्वाना माहित झाले आहेत. जगातील अनेक अग्रगण्य विद्यापीठातून योगावर पुष्कळ संशोधन होत आहे व उत्तम आरोग्यासाठी योग हे तत्व सर्वमान्य झाले आहे. आसन हे योगातील अंग चटकन दिसणारे व  आकर्षक अंग आहे. योगासनांच्या लोकप्रियतेमुळे योग व योगासन एकच आहेत असा समजही रूढ झाला आहे. पण योगासन  म्हणजे योग नव्हे. परंतु ते योगाचे एक महत्वाचे अंग आहे.
शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट आकृती म्हणजे योगासन. 'आस' म्हणजे बसणे या धातू पासून आसन हा शब्द तयार झाला आहे.    
प्राचीन ग्रंथांमध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत; उदा. राजयोग, हठयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग. यापैकी राजयोग व हठयोग या दोन्ही साधना मार्गांमध्ये योगासना ना महत्व दिले आहे. (1) राजयोग (पतंजली)- यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी, हि पतंजली राजयोगाची आठ अंगे आहेत. त्यांना अष्टांग योग ही म्हटले जाते. (2) हठयोग (घेरंड मुनी) - षट्कर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान व समाधी, ही हठयोगाची सात अंगे आहेत.

योगासनांचे प्रकार

आसनांचे अनेक प्रकार असले तरी तीन मुख्य प्रकार आहेत. १. ध्यानात्मक आसने, २. शरीरोपयोगी आसने, ३. विश्रान्तिकारक आसने.
१. ध्यानात्मक आसने - उदा. पद्मासन, स्वस्तिकासन, वज्रासन.
पतंजली मुनींनी आसनान्संबंधी "स्थिर सुखं आसनं" हे एकच सूत्र सांगितले आहे. फार पूर्वी केवळ ध्यानात्मक आसनेच होती .
शरीर  शांत व स्थिर करण्यासाठी ही आसने उपयोगी आहेत.
२. शरीरोपयोगी आसने - उदा.  हलासन, भुजंगासन, चक्रासन, वक्रासन, पर्वतासन सर्वांगासन, मयुरासन, त्रिकोणासन, कटीचक्रासन, ताडासन, अर्धचंद्रासन, उष्ट्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, सिंहासन, समकोनासन, भारद्वाजसन, भुजंगासन, धनुरासन
शरीरातील मणके व सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद होण्यासाठी या आसनांचा उपयोग होतो.
३. विश्रान्तिकारक आसने - उदा. शवासन, मकरासन.
शरीर व मनाला विश्रांती मिळण्यासाठी तसेच कल्पना  शक्तीच्या विकासासाठी ही आसने उपयोगी आहेत.

सूर्य नमस्कार ही  एक योगासनाची वैशिष्ठ्य पूर्ण मालिका आहे.

योगासनांचे लाभ  : योगासनामुळे शरीर लवचिक रहाते शिवाय स्वस्थ आणि उत्साही वाटते. शरीरातील चरबी कमी होऊन शरीर हलके-फुलके रहाते. श्वास घेणे आणि सोडण्यात कोणतीही अडचण येत नाही. म्हातारपण लांब रहाते. पचनसंस्था,  श्वसन संस्था इत्यादी चांगली रहात असल्याने रोग होत नाहीत.  योगामुळे ताण - तणाव, थकवा आणि आळस  लांब राहतात. योगासानांमुळे केवळ शरीरच नव्हे तर मन आणि मेंदूचेही संतुलन राखले जाते.  व्यक्तीमध्ये स्फूर्ती, जोश कायम रहातो.  नेहमी ताजेतवाने वाटते. विविध योगासनांचा उपयोग योगोपचारामध्ये रोग निवारणासाठी होतो. शारीरिक लाभांबरोबरच मानसिक शांती व अध्यात्मिक उन्नती हे आसनांचे खरे लाभ आहेत.

योगासानान्संबंधी साधे नियम
१. योगासने शक्यतो योग शिक्षकाकडून शिकून मग स्वतः करावॆ.
२. आसने करताना मन शांत व प्रसन्न असावे
३. फार ताण देऊन वा ओढाताण करून आसने करू नयेत.
४. अंतिम अवस्थे मध्ये काही क्षण थांबण्याचा प्रयत्न करावा.
५. योगासने व सूर्यनमस्कार प्रतिदिन नियमित करावेत.
६. योगसाधना संपवताना थोडा वेळ शवासन करावे.