रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

यम-नियम अष्टांग योग


यम-नियम

पतंजलींनी अष्टांगयोग सांगितला आहे. पतंजली मुनींनी सांगितलेल्या 'अष्टांग-योगा'ची ढोबळ मानाने दोन विभागात विभागणी होते.
१. बहिरंग योग (यम, नियम, आसन, प्राणायम)
२. अंतरंग योग (प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी)
हयामधील पहिली दोन अंगे यम व नियम. यम व नियमांतार्फत्, साधकाचे स्वत:चे वर्तन कसे असावे व  साधकाने समाजात कसे वागावे  हया विषयीचे मार्गदर्शन पातंजल मुनींनी केले आहे.
कोणतेही ज्ञान संपादण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. यम - नियमांच्या सरावाने व्यक्तिमत्वात  सकारात्मक बदल घडवून आणता येतात, व साधक योगाभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. यम, नियम ह्यामुळे मानसिक व भावनिक संवर्धनाला सुरवात होते. व्यक्तिच्या वर्तणुकीवर त्याचे चांगले परिणाम दिसण्यास सुरवात होते.
सर्वच संस्कृतींमधे, देशांमधे अहिंसा, सत्य यांसारख्या गुणांना महत्वाचे स्थान आहे. योग्याच्या जीवनात तर ते काकणभर जास्तच महत्वाचे आहेत. साधारणतः असे दिसून येते की समाजातील अनेक जण अहिंसा, अस्तेय यांसारख्या तत्वांचे पालन करत असले तरी ते पालन मनापासून असतेच असे नाही. लहान मुलांना त्यांचे आईबाप काय सांगितात? दुसर्‍यांशी मारामारी करू नको. का? तर शिक्षक रागावतील म्हणून. चोरी करू नये. का? तर पोलीस पकडतील म्हणून. म्हणजे अप्रत्यक्षपणे शिक्षकांना समजणार नाही अशा प्रकारे मारामारी करा किंवा पकडले न जाण्याची हुशारी दाखवून चोरी करा असेच त्या व्यक्तीच्या मनावर ठसते. मग तो मुलगा मोठा झाल्यावर या गोष्टींचे पालन तर करतो पण जोरजबरदस्तीने. मनापासून नव्हे. योग्याला मात्र असे करून चालत नाही. नुसत्या दिखाव्याने जगाला फसवता येईल पण स्वतःला कसे फसवणार? योगी या गुणांचा अवलंब करतो तो मनाचा पोत सुधारावा म्हणून. योगी खर्‍या अर्थाने हे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत असतो.
विस्ताराने यम व नियम यांची माहिती पुढे येईलच, परंतु थोडक्यात सांगायचे झाल्यास, यम व नियम हे मनास वळण लावणारे गुण आहेत. अहिंसा, अपरिग्रह अशा काही न करण्याच्या तसेच ईशस्तवन अशा काही आवर्जून करण्याच्या गोष्टींची एक जंत्री म्हणजे यम व नियम होत. अशी ही दोन अंगे (यम व नियम) समाजा कडून काही प्रमाणात अंगिकारली गेली तरी खूप चांगली समाज व्यवस्था निर्माण होईल.


यम

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रहमचर्य अपरिग्रहा यमा:  -  (पतंजली)

अहिंसा:
अहिंसा म्हणजे कोणत्याही सजीव प्राण्यास मुद्दामून आपणहून शारीरिक/ मानसिक/ भावनिक इजा न पोचवणे.
खरे सांगायचे तर प्रतिक्षण आपण हिंसा करतच असतो. आपल्या शरीराची निसर्गातः रचनाच अशी आहे की श्वास घेताना, अन्न पचवताना, रोगांचा प्रतिकार करताना आपोआप हिंसा होताच असते. ती तशी टाळता येणारही नाही कारण मनुष्यदेह निसर्गनियमांनी बांधला गेला आहे. तेव्हा अहिंसेविषयी अवास्तव कल्पना सुरवातीला साधकाने बाळगू नयेत. अवाजवी आणि अकारण हिंसा टाळणे एवढेच ध्येय ठेवावे.
प्रत्येक हिंसेची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया असते. आणि ही प्रतिक्रिया माणसाच्या दु:खाला आमंत्रण देते. आज मी कुणाचा अपमान केला तर आज ना उद्या तो त्याच्या पध्दतीने प्रतिक्रिया देणार आणि क्रिया-प्रतिक्रियांच्या साखळीत माझे मानसिक स्वास्थ्य  बिघडणार!

सत्य:
दूसरा यम म्हणजे सत्य अर्थात खोटे न बोलणे. असत्य वर्तनामागे अनेकदा स्वार्थ असतो. सरळ मार्गाने हवी असलेली गोष्ट मिळाली नाही की असत्याची कास धारून ती मिळवायची अशी वृत्ती बनते. म्हणजे परत मनाचा सात्विक भाव नासतो. सत्य हा वाटायला सोपा यम वाटला तरी आचरणात आणायला फार काठीण आहे. व्यवहारात अगदी छोट्या छोट्या गोष्टीत खोटं बोलण्याची सवय असलेली माणसं आपल्या आजूबाजूला अगदी सहज सापडतात. प्राचीन ऋषींच्या  अंगी सत्य बाणलेले असल्याने ते जे बोलत (आशिर्वाद अथवा शाप) ते सत्य ठरत असे.
सत्याचा दुसरा अर्थ असा. जे घडले ते मान्य करणे म्हणजे सत्य. वास्तवाचा स्वीकार म्हणजे सत्य. पण आपलं मन वास्तव स्वीकारायला घाबरतं, नाकारतं आणि ‘प्रत्यक्ष आहे पण मन स्वीकारत नाही’ अशी द्विधा अवस्था येते. जिथे द्वंद्व आहे तिथे शांती कशी?

अस्तेय:
चोरी न करणे म्हणजे अस्तेय, आज जी समस्या आहे ती ही "माझे नाही ते माझे झालेच पाहिजे"! त्या करता कोणताही मार्ग मी घेतो/निवडतो आणि मग अतिशय त्रास होतो. ‘वरकड’ कमाई आणि ‘ह्र्दयविकार’ यांचा घनदाट संबंध दिसून येतो.
अस्तेय म्हणजे जे आपले नाही ते न स्वीकारणे. सामान्यतः सर्वच जण असे सांगतील की ते अस्तेयाचे पालन करत आहेत. जर अशांना जंगलात हिंडत असता खजिना सापडला तर त्यातील किती त्याला हातही न लावता परत येतील हा विचार करण्याचा मुद्दा आहे. स्वार्थ फार खोलवर रुजलेला असतो. दैनंदीन जीवनात स्वार्थाला पदोपदी खतपाणी घातले जाते. कार्यालयात दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः लाटण्यापासून ते अगदी घरच्या संगणकावर पायरेटेड सॉफ्टवेअर वापरण्यापर्यंत सर्वच  गोष्टीत अस्तेयाचे सर्रास उल्लंघन केले जाते.

ब्रम्हचर्य:
ब्रम्हचर्य अर्थात ब्रहमाला धरुन आचरण.

अध्यात्म जगतामधे ब्रह्मचर्य हे खूप विविध अंगी मतप्रवाह असलेले तत्व आहे.   ब्रह्मचर्य हे एक थोतांड आहे इथपासून ते पराकोटीच्या ब्रह्मचर्याला पर्याय नाही इथपर्यंत मतप्रवाह आढळतात.
मुळात ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्माचे आचरण करणे. ही सारी सृष्टी ब्रह्मतत्वाचा विस्तारमात्र आहे. एक ब्रह्मतत्वच नाना रूपांनी या विश्वात ठासून भरले आहे. 'सर्वम खलिद्वम ब्रह्म' हा अध्यात्म-सिद्धांत सुपरीचीतच आहे. या मूळ ब्रह्मतत्वाचे आचरण वा पाठपुरावा करणे म्हणजे ब्रह्मचर्य.
ब्रह्मचर्याची विभागणी खालील प्रकारात करता येईल: गृहस्थी साधकाचे ब्रह्मचर्य,  वैराग्यशील साधकाचे ब्रह्मचर्य.
प्राचीन काळचे ऋषी पहिल्या वर्गात मोडत असत. गृहस्थी पुत्रपौत्रांसहीत जीवन जगूनसुद्धा त्यात संयम पाळून, विषयसुखाचा अतिरेक न करता त्यांनी ब्रह्मचर्य  साधले होते. वैराग्याशील माणूस (योगी, बैरागी, संन्यासी, अवधूत वगैरे) संसाराच्या भानगडीत न पडता वैराग्याचे काटेकोर अनुशीलन करून ब्रह्मचर्य साधतो.
आश्रम धर्माप्रमाणे स्त्री पुरुष समागम म्हणजे सुध्दा ब्रहमचर्यच. गृहस्थधर्म नीतीनियम पाळणे म्हणजे ब्रम्हचर्यच!


अपरिग्रह

अनावश्यक गोष्टींचा संग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह. अशा संग्रहामुळे मनस्वास्थ्य बिघडते. साधना निट होत नाही. अर्थात भविष्यासाठी योग्य तरतूद करण्याला अपरिग्रह आड येत नाही.

स्वात्माराम यांनी मात्र दहा यम सांगितले आहेत.
स्वात्माराम म्हणतात:
अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्यं क्षमा धृतिः।
दयार्जवं मिताहारः शौचं चैव यमा दश॥
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृति, दया, आर्जव, मिताहार, शौच हे दहा यम आहेत.

नियम
पतंजली मुनींनी शौच, संतोष, तप,  स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे ५ नियम सांगितले आहेत.

शौच

शौच म्हणजे स्वच्छता. ही स्वच्छता तीन स्तरावर असते - शारीरिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता आणि वातावरणाची स्वच्छता. शरीरिक स्वच्छतेसाठी स्नानाबरोबरच हठयोग अनेक शुद्धीक्रिया सुचवतो. धौती, नेती, बस्ती, नौली इत्यादी शुद्धीक्रियांनी शरीराची अंतर्गत शुद्धी होते. मानसिक शुद्धतेसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. नामस्मरण, सत्संग, सातपुरूषांच्या शिकवणीचे वाचन-मनन-चिंतन इत्यादी गोष्टी फायदेशीर ठरतात. साधनेची आणि राहण्याची जागाही शुद्ध असावी लागते. त्यासाठीच शक्यतो साधनेला वेगळी खोली असावी असे सांगितले जाते. साधनेच्या जागी भांडणे, भौतिक इच्छा-आकांक्षासंबंधींचे विचार कटाक्षाने टाळले पाहिजेत.

संतोष
अनेकदा असे दिसते की सर्वसाधारण मनुष्य आपल्या आयुष्यात नेहमी असमाधानी असतो. जे आहे त्यात समाधान न मानता अजून अपेक्षा करत बसतो. अशाने एक प्रकारची वखवख त्याच्या अंगात भिनते. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की मग दुसर्‍याच्या उत्कर्ष पाहून त्याचा जळफळाट होतो. दिवसरात्र अतृप्त इच्छांचे विचार आणि त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा यातच त्याच्या आयुष्यातील बराच काळ निघून जातो. योगसाधकाने संतोष अंगी बाणवला पाहीजे. हा फार महत्वाचा गुण आहे. रोजच्या जीवनात आजूबाजूच्या लोकांशी संपर्कात आल्याने त्यांच्या इच्छांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. एकीकडे वैराग्याकडे वाटचाल आणि दुसरीकडे भोगांविषयी सूक्ष्म स्तरावर आसक्ती असा विरोधाभास योगजीवनाला हानीकारक ठरतो. तेव्हा आपल्याला जे मिळत आहे ते परमेश्वरी इच्छेने असा भाव योगसाधकाने ठेवला पाहिजे आणि मिळेल त्यात संतोष मानला पाहिजे.
तप
तप या शब्दाचा अर्थ आहे तापवणे. योगशास्त्राच्या दृष्टीने शरीर आणि मनाला काही उपायांनी तापवणे म्हणजे तप. तापवल्याने गोष्टी शुद्ध होतात हा आपला दैनंदीन जीवनातील अनुभव आहे. शरीर आणि मनाचेही तसेच आहे. सर्वसाधारण माणूस शरीराला आणि मनाला फार लाडावून ठेवतो. मग ते त्याच्या ताब्यात रहात नाही. तपाचरणाने शरीर-मनाची शुद्धी होऊन ते योगसाधनेसाठी योग्य बनते. सर्वांना आचरणात आणता येण्यासारखे आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे एक तप म्हणजे उपवास किंवा एकभुक्त रहाणे. अर्थात हे केवळ एक उदाहरण सांगितले. अशी अनेक तपे सांगता येतील. कोणत्याही तपाचरणात शरीर-मनाला रोजच्या क्षमतेपेक्षा अधिक ताणणे हे महत्वाचे आहे. त्यामुळेच शरीर-मनाचा लाडावलेपणा कमी होवून त्याला शिस्त लागते.
स्वाध्याय
स्वतः चा शोध घेणे म्हणजे स्वाध्याय . तसेच स्वतः केलेला अभ्यास वा साधना म्हणजेही स्वाध्याय . वाचन, मनन, चिंतन असे अनेक टप्पे त्यात आहेत.
ईश्वर प्रणिधान
साधक जेव्हा आपली साधना सुरू करतो तेव्हा तो परमेश्वराचे अस्तित्व हे "आप्तवाक्य" म्हणून स्वीकारतो. जस जशी त्याची साधना दृढावते तसा तशी त्याला परमेश्वरी चैतन्याची अनुभूतीही येऊ लागते. अर्थात अशा प्रकारच्या दृढतेसाठी योगमार्गावर आणि आपल्या साधनेवर पराकोटीचा विश्चास असायला हवा. ईश्वर प्रणिधान म्हणजे सर्व व्यापक परमेश्वरा समोर पूर्ण लीन होणे वा समर्पित  होणे.

साधनपादामध्ये पतंजली मुनींनी काही नियमांबद्दल  लिहिले आहे.
तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः ।
तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांद्वारे योग साधतो. चित्तशुद्धी व्हावी एवढ्या एकाच हेतूने काया, वाचा आणि मन ह्यांवर ठेवलेले नियंत्रण म्हणजे तप, ॐ चा जप आणि चित्तशुद्धीकर शास्त्रादिकांचे अध्ययन करणे हा स्वाध्याय आणि आपली कायिक, वाचिक व मानसिक कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हे ईश्वरप्रणिधान. ह्या तिन्हींचे अनुसरण (अनुष्ठान) करणे म्हणजे क्रियायोग होय.

स्वात्माराम यांनी मात्र दहा नियम सांगितले आहेत. स्वात्माराम म्हणतात:
तप: संतोष आस्तिक्यम दानमीश्वरपूजनम।
सिद्धांतवाक्यश्रवणम ह्रिमती च जपो हुतम।
नियमा दश सम्प्रोक्ता योगशास्त्रविशारदै:।।    
तप, संतोष, आस्तिक्य, दान, इश्च्वरपूजा, सिद्धांतवाक्य श्रावण करणे, लज्जा, मती, जप, हवन हे योगशात्रातील तज्ञांनी सांगितलेले दहा नियम आहेत.

तर असे हे यम-नियम. योगशास्त्राचे मंदीर यम-नियमांच्या खांबावर भक्कमपणे उभे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यम-नियम एका दिवसात आत्मसात करता येत नाहीत. तसा प्रयत्नही करू नये. याच कारणास्तव योगशास्त्रात यम-नियमांवर पुढे कोठेही अवाजवी भर दिलेला नाही.

आपला नम्र,
वरदराज बापट

1 टिप्पणी:

  1. Excellent info. After d TITLE, just 1 sentence for "in nut-shell" & then bal. Very good. However u hv explained, only 2 of अष्टांग. Hope bal will follow. I learnt 1st 2 fm my parets, RSS & bal society. Additionally, I am practicing only 2 i.e. Aasan & Pranayam. Wud like to refine them thru u, once we meet i.e. after 20th March.

    उत्तर द्याहटवा