शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

OmKar


ओम (ॐ)
ओम (ॐ) हे योग मार्गातील व हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. ओम हे ब्रह्माचे एकाक्षरी प्रतिक आहे.
ओंकार हा 'अ' कार, 'उ' कार व 'म' कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे.
" अ कार चरण युगुल, उकार उदार विशाल, मकार महा मंडल, मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले " असे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.
हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असे शास्त्रांनी म्हटले आहे.

ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. त्याने सृष्टीचा निर्माता ब्रह्मा याचे स्मरण होते. उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चंबू होतो. त्या चंबूच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार अशा विष्णूचे स्मरण होते व सृष्टीच्या चक्राचा प्रारंभ होतो. म् उच्चारतांना ओठ बंद होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक आहे.त्याने सृष्टिसंहारक शिवाचे स्मरण होते. अ हा स्वर सर्वांत कोमल स्वर आहे, तसेच तो ओम्-कारातील आद्य स्वर आहे. त्यामुळे, 'अ' हा स्वर उच्चारल्यास आपणास मूलध्वनीचा आभास होतो. उ हा मुखोत्पन्न (केवळ मुखातून निघालेला) सर्वाधिक तीव्र स्वर आहे. अर्थात, ती तीव्र शक्ती आहे. अशी शक्ती आपणास संकटाच्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन देवी-देवतांची शक्ती जागृत करणाऱ्या विष्णूचे स्मरण करवून शरीराला ऊर्जा प्रदान करते. म् हे प्राथमिक अनुनासिक असून ते उच्चारले असता त्याआधील ध्वनीचा लोप होतो व वातावरण पुन: शांत होते. हा उच्चार आपणास परमतत्त्व शिवाचा आभास घडवतो. अशाप्रकारे, ओम्-कार हे परमतत्त्व प्रदर्शक चिन्ह आहे असे हिंदूधर्मात सांगितले आहे.

या सृष्टीचे पालक ब्रह्म,विष्णु व महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.
ओम हा तीन अक्षरांचा लघु मंत्रच आहे. याचा जप केल्याने जगाच्या सर्व दिव्य शक्तींचे स्मरण केल्यासारखे होते.
भगवान पतंजलीनी ओंकारासाठी प्रणव हा शब्द योजिला आहे. प्रणव म्हणजे भगवंतासाठी उच्चारलेला स्तुतिपर शब्द.
पाणिनी मुनींनी ओंकाराचे अठरा अर्थ विदित केले आहेत. रक्षक, संचालक, द्युतिमान, प्रिय इत्यादी. गुरु नानक यांनी 'इक ओंकार सतनाम' (ओंकार हेच खरे सत्य असे नाव आहे) अशी त्याची व्याख्या केली आहे.
ओम चा उच्चार करताना नादाशी पूर्ण एकरूप व्हावे व कंपनांचा अनुभव घ्यावा.
ओ पेक्षा म लांबवून केलेला उच्चार अधिक प्रभावी ठरतो. ओ च्या उच्चाराने मेंदूमध्ये अल्फा तरंग तर म च्या उच्चाराने थिटा तरंग निर्माण होतात कि ज्या प्रगत शांत अवस्थेच्या निर्देशक आहेत.
ओमकारा  च्या नित्य साधने मुळे  ऐहिक व आरामार्थिक असे दोन्ही लाभ होतात.
ओम कारं बिंदू संयुक्तं नित्यं धायन्ति योगीन:
कामदं मोक्षदम चैव ओम काराय नमो नम:

प्रणव साधना  शारीरिक व मानसिक स्तरावर अत्यंत लाभदायक आहे. रोग प्रतिबंधक व रोग निवारक असे दोन्ही गुण त्यात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा