गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

Food in Maharashtra during Shivaji Maharaj Period

****** रोज एवढे मटण खातोय तरी कोण ? : रायगडावरील वृद्ध खाटकाला पडलेला प्रश्न ******
हा प्रसंग आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळचा. इंग्रज डॉक्टर आणि प्रवासी डॉ. जॉन फ्रायर , इतर इंग्रज प्रतिनिधींबरोबर राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झाला होता. या सर्वांचा मुक्काम रायगडावर असताना घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाचे वर्णन फ्रायरने आपल्या प्रवास वर्णनात केले आहे . या मजेशीर प्रसंगाची हकीगत त्याच्याच शब्दात ऐकू !
" रायरी (रायगड ) वरील आमच्या मुक्कामादरम्यान घडलेला एक प्रसंग मी येथे सांगू इच्छितो . इथल्या लोकांचे जेवण अत्यंत साधे आहे आणि ते तयार करण्यासाठी फारसा खर्च देखील येत नाही. इथल्या लोकांचा परमोच्च आवडीचा पदार्थ म्हणजे खिचडी ( फ्रायर या पदार्थाला cutchery असे म्हणतो ! ) हा खिचडी नावाचा पदार्थ तांदूळ आणि डाळ एकत्र करून , हे मिश्रण लोण्यामध्ये शिजवून तयार केला जातो. या खिचडीवरच या लोकांचे देह पोसलेले असतात. परंतु आमच्या सारख्या तिन्हीत्रिकाळ मांस खाण्याची सवय असलेल्या इंग्रजांचा फार काळ पर्यंत मराठयांची ही खिचडी खाऊन निभाव लागणे अशक्य होते , त्यामुळे आम्ही राजाला ( शिवाजी महाराजांना ) आमच्या समूहातील लोकांना पुरेल एवढे मांस रोज देण्याची विनंती केली. आमची ही विनंती मान्य करून शिवाजी महाराजांनी , गडावर थोड्याफार प्रमाणात असलेल्या मुसलमानांसाठी (फ्रायर Moors असा शब्द वापरतो . Moors म्हणजे मुसलमान ) मांस पुरवणाऱ्या खाटकाला , आम्ही गडावर असे पर्यंत आम्हालाही लागेल तेवढे बोकडाचे मांस (दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे मांस गडावर येत नसल्यामुळे ) पुरवत जावे अशी आज्ञा केली .
शिवाजी महाराजांच्या या आज्ञेप्रमाणे हा खाटीक आम्हाला रोज बोकडाचे मांस पुरवू लागला . आम्हाला प्रत्येक दिवसाला साधारण पणे अर्धा बोकड लागत असे . आमच्या या दररोजच्या मागणीमुळे या खाटकाचा धंदा फारच जोमाने चालू लागला ! त्याला या गोष्टीचे एवढे आश्चर्य वाटले की , " एवढे मटण रोज खातंय तरी कोण ? " हे पाहण्याकरता वृद्ध असलेला हा खाटीक , गड चढण्याचे कष्ट सोसून एके दिवशी आम्हाला पाहायला आला ! गेल्या काही वर्षात त्याच्याकडून इतके मांस कोणीच विकत घेतले नव्हते ! याचे कारण म्हणजे या प्रदेशातील लोक फारच कवचित मांसाहार करतात; शिवाय हिंदू लोक ( फ्रायर येथे Gentiles असा शब्द वापरतो . Gentiles याचा अर्थ यहुदी नसलेले लोक असा होतो, सामान्यपणे इतिहासामध्ये हिंदूंना हा शब्द वापरतात ) अजिबातच मांस खात नाहीत आणि मुसलमान किंवा पोर्तुगीज लोक मांस चांगल्याप्रकारे उकडल्याशिवाय किंवा शिजवल्याशिवाय खात नाहीत . आपल्याप्रमाणे ( इंग्रजांप्रमाणे ) मांस फक्त भाजून असे क्वचितच कोणी खात असेल ! पण मला असे वाटते की मांस खाण्याची आपली ही पद्धत चुकीची आहे. खास करून या उष्ण देशामध्ये मांस नीट शिजवून खाल्ल्यास त्याचा पोटाला त्रास होणार नाही , परंतु आपला स्वभाव सतत धावपळ करण्याचा असल्यामुळे , आपण हे मांस शिजवण्याबीजावण्याच्या भानगडीत पडत नाही . पण माझ्या मते आपली पोटं बिघडण्यामागचे हेच कारण असावे हे अनुभवी लोकांच्या लक्षात येईल !"
- डॉ जॉन फ्रायर
ता.क :- वरील वर्णन वाचून , त्या काळातील मराठे अजिबातच मांसाहार करत नसावेत असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे नाहीये. हिंदू लोक सुद्धा थोड्याफार प्रमाणात मांसाहार करत होते. पण युरोपियन माणसाच्या मांसाहार करण्याच्या तुलनेत हे प्रमाण अगदीच नगण्य होते.
संदर्भ :-
१) Travels in India in the Seventeenth Century :- Dr.John Fryer's account of India
चित्रे :-
१) पाचाड येथून दिसणारा किल्ले रायगड 
२) डॉक्टर जॉन फ्रायर
३) मांस खाणारे युरोपियन ( प्रातिनिधिक चित्र )
लेखक :-
सत्येन सुभाष वेलणकर 
पुणे ,
३ ऑक्टोबर २०१८

बुधवार, १३ जून, २०१८

अष्टांग योग

अष्टांग योग
पतंजलिंनी योग चा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ अंग आहेत, जे खालिल प्रमाणे आहेत:
  • यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
  • नियम (स्वाध्याय, सन्तोष, तप, पवित्रता, आणि ईश्वर च्या प्रति चिन्तन) बाहेरचे अंग
  • योगासन बाहेरचे अंग
  • प्राणायाम बाहेरचे अंग
  • प्रत्याहार बाहेरचे अंग
  • धारणा आतले/मानसीक अंग
  • ध्यान आतले/मानसीक अंग
  • समाधी आतले/मानसीक अंग

अष्टांग योग आणि त्याचे योगाभ्यासातील महत्त्व


अष्टांग योग आणि त्याचे योगाभ्यासातील महत्त्व


योगशास्त्र हे मुख्यत: प्रायोगिक शास्त्र applied science किंवा experimental science असल्यामुळे त्यात सैद्धांतिक भागाबरोबर किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्व प्रयोगाला किंवा साधनेला आहे. म्हणूनच महामुनी पतंजलींनी योगदर्शनामध्ये चित्तवृत्तींच्या निरोधाचे उपाय, क्रियायोग, साधनेच्या मार्गात येणारे अडथळे आणि ते दूर करण्यासाठी ध्यानादी प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजेच योगाची आठ अंगे किंवा अष्टांग योग होय.
ही आठ अंगे मुख्यत्वे दोन विभागांत आहेत. बहिरंग योग - ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम येतात आणि अंतरंग योग - ज्यात धारणा, ध्यान, समाधी येतात. पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार जे बहिरंग योगाला अंतरंग योगाला जोडणारा सेतू आहे. माणसाचे स्थूल शरीर व सूक्ष्म मन यांचा अत्यंत घनिष्ट संबंध आहे. म्हणूनच त्यांचा एकत्रितपणे विचार करून शरीरसंवर्धनासाठी आणि मनशुद्धीसाठी, मनोकायिक आरोग्य लाभावे म्हणून ही यम, नियम आदी साधने सांगितली आहेत. ही अंगे मानवी अस्तित्वाच्या बाह्यांगाचा प्रामुख्याने विचार करतात, म्हणून त्यांना बहिरंग योग म्हणतात.
लयबद्ध श्वसनाला योगामध्ये अतिशय महत्त्व आहे. प्राणायाम हे योगोपचारातले एक प्रमुख साधन आहे. प्राणायामाच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसनक्षमता वाढते आणि म्हणूनच साधकाचे आयुष्य वाढते. साधकाला निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न चित्त, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचूक निर्णयक्षमता प्राप्त होते.
प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रिये यांच्यावर ताबा मिळवण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते. तर एखाद्या बिंदूवर, विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते व मनात सतत उद्भवणाºया विचारांचे संकलन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात. धारणा दीर्घकाळ टिकून राहिली की मगच ध्यान लागते. साधकाच्या संपूर्ण मनोकायिक रचनेमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्याची शक्ती असते म्हणूनच ध्यानाला अतिशय महत्त्व आहे.
कोणत्याही त-हेचा व्यत्यय न येता दीर्घकाळ ध्यान लागले की समाधी लागते. हे योगसाधनेतील शेवटचे अंग किंवा टप्पा आहे. समाधी अवस्था हीसुद्धा एक अनुभूती आहे आणि त्यामुळेच ती वर्णनातीत आहे.
मनापेक्षाही सूक्ष्म स्वरूपातील आत्मा हा शरीर व मन यांच्या दुहेरी कवचामध्ये सुरक्षितपणे, अव्यक्त स्वरूपात वास करतो असे मानले जाते. जणू मंदिरातील गाभाºयात खोलवर असणारे धीरगंभीर शिवलिंगच. अशा अव्यक्त अतिसूक्ष्म, खोलवर दडी मारून बसलेल्या आत्म्याच्या उन्नतीसाठीच धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन साधने आहेत.
आरोग्यप्राप्तीसाठी योगाभ्यास करणा-या तुम्हा-आम्हासारख्यांना फक्त योगासने, प्राणायाम व ध्यान म्हणजे योगाभ्यास असे वाटते. याच गैरसमजुतीमुळे अनेकदा ते चुकीच्या टप्प्यांवर चुकीच्या पद्धतीने अवलंबिली जातात आणि विनाकारण आपत्तींना आमंत्रण मिळते.
प्रत्येक साधकाने जीवनाची योग्य दिशा दाखवणा-या सर्वांगाचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला तर योगाभ्यासातून अपेक्षित व्याधीरहित जीवन आपल्याला जगता येईल.
मधुमती निमकर - योगतज्ज्ञ

सोमवार, २१ मे, २०१८

Seeds बियाणे


प्रमोद लक्ष्मण तांबे यांच्या fb wall वरून ....

Forwarded.
पुर्णपणे शाश्वत शेती करायची या उद्देशाने आम्ही आमचं गावं गाठलं आणि काही अडचणी समोर आल्या .त्यातील मुख्य अडचण म्हणजे देशी बियाणे मिळणे.गावात आजूबाजूला चौकशी करून सुध्दा खूप पिकांची देशी बियाणे मिळेनात पण शोध चालूच ठेवला तेंव्हा एक नाव समोर आलं संजय पाटील.गेली 12 वर्षे हा माणूस देशी बियाणे जतन आणि संवर्धन यावर काम करत आहे.त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी समोर आल्या ज्या शेअर कराव्या वाटल्या तेच लिहीत आहे

सध्या जगभरातील सगळ्या बियाणांची जी बियाणे बँक आहे ती नॉर्वे या देशात आहे . तेथील काही कंपन्याच्या ताब्यात जगातील सर्व बियाणे आहेत .हरितक्रांतीच्या नावाखाली, अधिक उत्पादन देतील अशी आम्ही बियाणे बनवतो असे सांगून जगभरची सगळी बियाणे जमवून त्यावर प्रक्रिया करण्यात आली ;आणि मग नवी बियाणे त्या कंपन्यांच्या नावाने पेटंट मिळवून बाजारात उतरवली. शेतकऱ्यांना ही लालूच दाखवली की आपल्याला एका वेळी जास्त उत्पादन ,कमी वेळ ,कमी श्रम हे सगळे ह्या संकरित बियाणाने साधता येते. साहजिकच जगभरची लोकं ह्याला भुलली आणि आपले स्वतः चे बियाणे टाकून हे तथाकथित उत्तम बियाणे घेतले.आता अशी परिस्थिती आली आहे की आपली पूर्वीची बियाणे तर नष्ट झाली आहेत आणि जी संकरित बियाणे आहेत ती तर परत वापरताच येत नाही .मग या कंपन्या देतील तरच आणि त्याच भावात आपण अन्न पिकवू शकू .ते सांगतील त्या अटींवर जगाला ते नाचवत आहेत.कोणत्या देशाने काय पीक घ्यायचे हेही तेच ठरवतात .

पण सुदैवाने आपल्या देशात मात्र अजून काही प्रमाणात देशी बियाणं जिवंत आहे . त्याची जी कारण आहेत ती म्हणजे आपली जैव विविधता ,आदिवासी लोकं (ज्यांना आमच्या तथाकथित विकासाचा गंध नाही ),काही जुन्या रूढीं परंपरा , आणि महिलांच्या परसबागा .
तसेच आपल्या पैकी खूप कमी लोकांना माहीत आहे की ज्या देशांना आपण विकसित म्हणून नावजतो त्यापैकी खूप देशांत शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात काय पिकं घ्यायचं हे सरकार ठरवतं. ते ही या बियाणं कंपनी सांगतील तेच पिकं घ्यायचं. पण सुदैवाने भारतात अजून अशी पद्धत नाही म्हणून छोटे छोटे शेतकरी आपलं बियाणं जगवू शकतात.

आपल्या कडील सण साजरे करण्यामागे काही उद्दिष्टे होती .उदा.आपल्या कडे नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी करतात .त्या दिवशी माझ्या कडे जे पिकं आलं त्याचे तोरण दाराला लावायचे. म्हणजे जे धान्य माझ्या तोरणात नाही ते पिकं मी घेतले नाही हे कळायचं. इतर लोकं ते धान्य मला देणार मीहि तसेच करायचे.
दुसरा सण संक्रांत यात प्रत्येक स्त्री 5 जणींना वाण द्यायची त्यात आपल्याकडील बियाणे असायचे .म्हणजे एका घरी वेगळी 25 बियाणे मिळायची . आता शहरांशी संपर्क आल्यामुळे गावातील बायकाही प्लास्टिक डबे वाण म्हणून देतात . कारण शहरात शिकलेली माणस राहतात ते थोडीच चुकणार आहेत .

आपल्याकडे बियाणे विकणे हे पाप होते.आता पाप पुण्य हा ढोंगीपणा झाला त्यामुळे हे सण नष्ट झाले . नाहीतर नुसता उपचार राहिला सण साजरा करायचा.
नंदुरबार जिल्ह्यात अस्थम्भा नावाचा डोंगर आहे तिथे अजूनही दिवाळीनंतर 150000 लोकं अश्वत्थामा च्या दर्शनासाठी येतात. नैवेद्य म्हणून आपले बियाणे आणतात आणि प्रसाद म्हणून तिथे ठेवलेलं बियाणं घरी नेतात.कोणीही हा उत्सव आयोजित करत नाहीत तरी रुढी नुसार स्वतःहून लोकं जमतात आणि बियाणांची देवाण घेवाण होते.

आपल्या कडे धान्य साठवणे ,बियाणे टिकवणे ह्याच्याही खूप विचारपूर्वक तयार केलेल्या पध्दती होत्या .पण त्या आता गावातूनच हद्दपार झाल्या.
गावातील जुन्या लोकांना घोळात घेऊन विचारले की तुम्हाला या पद्धती कश्या माहीत नाहीत तर म्हणतात आमची मुले शाळेतून शिकून सवरून आली आहेत. ते म्हणतात तुम्ही अशिक्षित आहात तुम्हांला काही कळत नाही.तुम्ही नका शिकवू आम्हाला. हा अनुभव आमचाच नाही तर सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या खूप जणांना आलेला आहे .खरंतर या लोकांना खूप ज्ञान आहे पण आपण अडाणी या न्यूनगंडा मुळे काही बोलत नाहीत.1922 ते 1938 भारतात सर अल्बर्ट हॉवर्ड नावाचे इंग्लंड चे शेती संशोधक येऊन गेले त्यांनी ब्रिटिश राणीला सांगितले होते की भारतातील प्रत्येक शेतकरी हा संशोधक आहे त्याला नष्ट करू नका जगाला ते घातक ठरेल.पण इथले शास्त्रज्ञ मात्र आमच्या शेतकऱ्यांना वेडं ठरवतात.नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक अत्यंत खेडूत बाई ' राई बाई पोपेरे 'ह्यांचे बियाणांवर खूप काम आहे. पण जेव्हा पहिल्यांदा त्या स्टेजवर बोलणार होत्या त्यावेळी समोर माशेलकर, भटकर,अकोलकर असे शास्त्रज बसणार आहेत मग काम जरी या बाईचं असेल तरी कोणीतरी शिकलेल्या माणसाने प्रेझेन्टेशन द्यावे अशी संयोजकांनी मागणी केली . पण संजय पाटीलांनी ते न ऐकता त्या बाई बोलणार हाच आग्रह धरला .ज्यावेळी त्या बाईने आपले ज्ञान दाखवले .तेंव्हा ही मंडळी आवाक झाली.ही शास्त्रज्ञ मंडळी तेंव्हा पासून त्यांच्या कडे जायला लागली .पण आमचा दृष्टकोन कधी बदलणार?
आम्ही आमच्या पूर्वजांना नावं ठेवतो की माणसाची ओळख ते जातीवरून करायचे किती संकुचित होतें ते. पण दुर्देवाने सध्या आपण माणसाची ओळख त्याच्या साक्षरते वरून करतो.त्याने ह्या युनिव्हर्सिटी हे संशोधन केले म्हणजे त्याला या बाईपेक्षा कितीतरी ज्ञान असणार असे आपण गृहीत धरतो.भारतात अश्या कितीतरी राईबाई आहेत ज्याच्याकडूनच आपलं जुनं शेती तंत्र आपल्याला कळू शकतं.या शास्त्रज्ञांनी प्रयोग शाळेत संशोधन केलेले असते ते कित्येक वेळी जमिनी वर लागूच होत नाही असे अनुभव आलेले आहेत.

असे म्हणतात की भारतात तांदळाच्याच 15000 जाती होत्या. त्या नष्ट होऊन फक्त 500 वर आल्या आहेत पण ह्या जरी जाती आपण टिकवल्या तरी आपण जगात टिकू शकू.कारण भात हेच भारतचे मुख्य पिकं आहे .आता आपल्याला अश्या कितीतरी sites दिसतील की गहू किती त्रासदायक आहे आपल्याला हे सांगतात . हरितक्रांती च्या नावाने देशात मुबलक पिकं निर्माण होणार या गोंडस नावाखाली गहू आपल्यावर लादला .
मध्यंतरी रेशनवर 2 रु किलो गहू मिळायला लागला .त्यामुळे काही श्रम न करता जर धान्य मिळत तर शेती कराच कशाला ?असा विचार करून कोकणातील शेतकऱ्यांनी नाचणी घेणे सोडलं आणि घाटावर ज्वारी कमी पिकू लागली.कित्येक ठिकाणची ज्वारी आणि नाचणीची देशी बियाणे नष्ट झाली.त्यानंतर लगेच असं संशोधन झाले आहे की नाचणी ,ज्वारी हे माणसाला हितकारक आहेत .म्हणून कित्येक डॉक्टर गहू बंद करून नाचणी आणि ज्वारी लोकांना खायला सांगतात .म्हणजे परत ही पिकं घ्यायची तर बियाणे कुठलं ?याचं कंपन्याचं. नाहीतर यांचाच multi grain आटा घ्यायचा म्हणजे तुम्ही पिकवू नका आम्ही देते तुम्हाला वाटेल त्या भावाला.
पूर्वी आपल्या कडे धान्याची खूप variety होती.कोणत्या सणाला कोणते पदार्थ करायचे हे सगळे ऋतू,स्थळ ह्यानुसार ठरवले होते .ते सगळे आरोग्या साठी उत्तम होते .आता जागतिकरणं या नावाखाली फक्त गहू,तांदूळ आणि मका ह्या तीनच धान्यांनी आपलं 85 % खाणे व्यापून टाकलं आहे.त्यामुळे हळूहळू खूप प्रकारची स्थानिक धान्य लुप्त झाली आहेत.जी की निसर्गाने आपल्या साठी बनवली होती. ते नसल्याने आता नवनवीन आजार निर्माण झाले.

या वर उपाय म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीने परत शेती सुरू करणे.आपली शेती ही शाश्वत ,परस्पर पूरक होती. फक्त एक देशी गाय आणि देशी बियाणे ह्या वर उत्तम शेती होऊ शकते.गरज आहे ती फक्त ते जाणून घ्यायची.
सध्या भारतात या बियाणे जतनावर खूप लोकं अगदी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.त्यांना multi नॅशनल co धमक्या देतात पण तरीहि ते आपलेे काम सोडत नाहीत. ही लोकं शेतकऱ्यांना जमा करतात त्यातील जुन्या लोकांकडून तेथील स्थानिक बियाणांची माहीती घेतात .बाकीच्यांना पटवतात की देशी बियाणे च वापरा .जुन्या लोकांचे ऐका . तुम्हीच स्वतः त्याचे जतन आणि संवर्धन करा .बियाणे ही कधीही विकायची गोष्ट नाही तसेच खरेदीही करायची गोष्ट नाही हे पटवतात . आपल्या कडील रूढी परंपरा ह्या शहरातील लोकांचे बघून सोडू नका, पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास ती शाश्वत ठरते.भरघोस उत्पादन याकडे न बघता चांगले पिकं या कडे लक्ष केंद्रित करा.
जागतिक करार नुसार आपल्या कित्येक बियांचे पेटंट हे या multi नॅशनल co. कडे आहेत .त्यासाठी लढा देणे ,शेतकऱ्यांना स्वतः कडील बियाणं समृद्ध करून त्यांची पेटंट घेऊन देणे अशी अनेक जोखमीची कामे ही लोकं करत आहेत. अश्या लोकांना मदत सोडाच पण त्यांची साधी माहितीही आपल्याला नसते.
या सगळ्यांना दिर्घ आयुष्य मिळो ही प्रार्थना आणि त्यांच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा