गुरुवार, २४ जून, २०२१

वटपौर्णिमा !

 #वटपोर्णिमा


#Celebrate_marriage


#Be_Dharmic_Be_Satvik


#भारतातले_वृक्ष


उद्या वटपौर्णिमा म्हणजे जेष्ठ पक्षातील पौर्णिमा, जेष्ठ पौर्णिमा!


नवरा आणि बायको, पती आणि पत्नी ह्यांच्या नात्याचा गोडवा, पवित्रता जपणारा असा हा सण! 

धार्मिक उत्सव सुरू झाल्याची चाहूल देणारा पहिला सण... 


कोविद चे सावट आहेच, पण "वर्क फ्रॉम होम" असल्याने आपण अगदी अर्धा तास काढून हे व्रत छान पद्धतीने करू शकतो. ऑफिस मधून यायला उशीर झाला हे कारण देता येणार नाही 😊


आपले कुठलेच सण "यूँही" नसतात! कोणतातरी पराक्रम, कोणतीतरी महत्त्वाची घटना वर्षानुवर्षे लक्षात रहावी आणि समाजाची वीण घट्ट व्हावी म्हणून आपण सण साजरे करतो. ह्याला अर्थातच शास्त्रीय कारणे, सामाजिक कारणे व निसर्ग ह्याची जोड दिलेलीच असते.


काय आहे हे "वटसावित्री" हे व्रत? पट्कन पाहूया...


अश्वपती नावाच्या राजाने, संतानप्राप्तीसाठी देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले आणि देवीच्या कृपेने त्याला कन्यारत्न झाले. त्या कन्येचे नाव राजाने ठेवले सावित्री! 

अतिशय तेजस्वी असलेल्या सावित्रीने सत्यवान नावाच्या अतिशय पराक्रमी, सज्जन, तपस्वी राजपुत्राला वर म्हणून निवडले... नारदमुनीनी जेव्हा सावित्री ला सांगितले की सत्यवान अल्पायुषी आहे व लग्नाच्या वर्षभरातच मरणार तेव्हा आपला निर्णय न बदलता ह्या तेजस्वी स्त्रीने वर्षाअखेर 3 रात्र "वटसावित्री" हे व्रत केले. आणि साक्षात यमदेवाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले.

असे देवी सावित्रीचे सावित्रीने केलेले व्रत म्हणजे वटपौर्णिमा व्रत!


सावित्री जशी यमाकडून पतीचे प्राण पुन्हा खेचून आणते, ती क्षमता, ती capability प्रत्त्येक स्त्री मध्ये आहे ह्याची आठवण करून देणारा हा सण!


#भक्कम_कुटुंब_व्यवस्था


नवीन लग्न झालेले जोडपे असो किंवा नातं पूर्ण मुरलेले, आपली पत्नी आपल्यासाठी छान नटली आहे, सुंदर दिसते आहे, पूजा करून आली आहे आणि आपल्या उत्तम आयुष्यासाठी प्रार्थना करून आली आहे हे कुठल्या बरे नवऱ्याला आवडणार नाही... प्रेम वृद्धींगत करणारा असा हा सण! 😊😊


महामार्गावर दोरा गुंडाळलेला वड दिसला की एकदातरी, स्वतः केलेली पूजा, नवऱ्याने नजरेनेच "सुंदर दिसतेयस" सांगितलेला क्षण, आठवेल की नाही? म्हणून साजरा करायचा हा सण! 😊😊


पती-पत्नी एकमेकांबरोबर पूर्ण आयुष्य राहतात (राहू शकतात) आणि आपले घरकुल, आपले कुटुंब जोपासतात (अनेक त्याग करून) ही संपूर्ण जगाला भारताने दिलेली शिकवण आहे. हे कमावण्यासाठी उचललेले छोटेसे पाऊल, म्हणून साजरा करायचा हा सण! 😊😊


#पर्यावरण_पूरक


आपण ज्याची पूजा करतो ना, त्यावर कुऱ्हाड चालवताना क्षणभर तरी थांबतो, एखाद्याला विचारतो, का रे बाबा झाड तोडतो आहेस? This is human tendency, human mind. 

एक वडाचे झाड शंभर व्यक्तीना शंभर वर्षे पुरेल एवढा प्राणवायु देते असे म्हणतात. प्राणवायूची कमतरता झाली तर काय काय होऊ शकते हे आपण काही महिन्यांपूर्वीच पाहिलेले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी उचललेले छोटेसे पाऊल! 


#धार्मिक_शास्त्रीय


आणखी एक महत्त्वाचे - वड - हा यज्ञीय वृक्ष आहे. म्हणजे आपण जेव्हा देवतांची पूजा करताना होम, हवन करतो तेव्हा ह्या वृक्षाच्या समिधा यज्ञात वापरल्या जातात. ह्या वृक्षामध्ये साक्षात भगवंताचा वास असतो. वटवृक्षाची पूजा केल्याने आपले पितृ संतुष्ट होतात आणि पती-पत्नींमधील नाते घट्ट होऊन, वंश संरक्षण होते. 


#औषधी


औषधी गुणधर्मामुळे वडाच्या झाडाच्या आसपासची हवा अत्यंत शुद्ध असते. आसपास भरपूर प्राणवायू असतो. त्याचा आपल्या आरोग्यावर अतिशय सुंदर परिणाम होतो.


गर्भाच्या संरक्षणासाठी वटांकुर रस गर्भवतीच्या नाकात घातला जातो. 


#वडाची_पूजा


कसे आहे ना, वटसावित्री व्रत असे म्हणले की काहीतरी खूप अवघड वाटते, वडाची पूजा म्हणले ना की सोप्पे वाटते 😊😊


मग कशी करूया वडाची पूजा?


आता आपण 3 दिवसांचे व्रत कोणीच करत नाही. पण कमीतकमी उद्या पूजा होईपर्यंत उपवास करून, आपल्या अंगणात, आवारात, जवळपास वडाचे झाड असेल तर तिथे जाऊन, गणपती, विष्णु, शंकर, सूर्य व सावित्री देवी ह्यांची मनोभावे प्रार्थना करायची. 


हळद, कुंकू व इतर उपचार द्रव्य ह्यांनी झाडाची, देवी सावित्री ची पूजा करून वडाच्या झाडाच्या सानिध्यात, त्याचे औषधी गुणधर्म, भरपूर ऑक्सिजन आपल्याला मिळावा म्हणून 7 प्रदक्षिणा वडाला घालायच्या, किंवा काही काळ तरी बसायचे. 


खालील मन्त्र म्हणून वडास नमस्कार करावा.


"सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।

तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।

अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।

अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।"


ब्राह्मण दानाला ह्या व्रतामध्ये विशेष महत्त्व आहे. न विसरता गुरुजींची दक्षिणा बाजूला काढून नंतर गुरुजींची भेट झाल्यावर द्यायची किंवा google pay झिंदाबाद! तिथे बसून गुरुजींना ट्रान्सफर केलेत तरी चालेल :) :) 


Celebrate, enjoy... रडक्या लोकांकडे दुर्लक्ष करा. 


आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सत्यवान व सावित्री प्रमाणेच, सावित्री देवी आपल्या सर्वांना ऐश्वर्य, आरोग्य, पुत्र-पुत्री, यश व कीर्ती भरभरून देवो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना...


शुभं भवतु | 


--- मृदुला बर्वे, oPandit

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा