गुरुवार, २४ जून, २०२१

Vat Pournima

 #विवाहविचार लेखक सुजीत भोगले


सावित्री कोण होती ?? 


वटसावित्री अर्थात वटपौर्णिमेचा सण आला की हिंदू पुरुष थट्टा करण्याच्या मूड मध्ये येतात. सात जन्म याच बायकोला कसे झेलणार आहोत वगेरे. हिंदू लोक सुद्धा स्वतःच्या कळत नकळत या दिवसाची थट्टा करायला लागतात. फुरोगामी आणि हिंदू द्वेषी मंडळीना तर हिस्टेरिया होतो. 


परंतु विवाहविचार या संकल्पनेतील सर्वाधिक सुंदर कथा सावित्रीची आहे. पाश्चात्य देशातील मंडळी ‘woman of substance” या संकल्पनेचा उल्लेख वारंवार करत असतात. सावित्री ही त्या संकल्पनेचे मूर्त रूप आहे. 


महाभारतात एकदा युधिष्ठीर मार्कंडेय ऋषींना म्हणाला की या विश्वात द्रौपदी समान समर्पित आणि त्यागमयी स्त्री अन्य कोणीही नाही. द्रौपदीचा उल्लेख पंचकन्यांच्या मध्ये केला जातो ज्या प्रातःस्मरणीय आहेत. परंतु मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराचे मत खोडून काढतात आणि त्याला सावित्रीची कथा सांगतात. 


सावित्री ही अश्वपती राजाचे एकमेव अपत्य असते. सावित्री ही अत्यंत रूपवान, गुणवान आणि बुद्धिमंत असते. तिच्या या रूप गुण आणि विद्वत्तेची चर्चा स्वर्ग लोकात सुद्धा होत असते. अश्वपती राजाला आपल्या कन्येचा विवाह विष्णूशी व्हावा असे वाटते. तो नारदाच्या मार्फत तसा संदेश विष्णूकडे पाठवतो. परंतु तिच्या रूप, गुण आणि बुद्धिमत्तेच्या पासंगाला आपण पुरणार नाही हे जाणून विष्णू त्या विवाहाला नकार देतो.(इथे विष्णू हे पद म्हणून समजून घ्या. देव म्हणून नाही ) 


सावित्री द्युमत्सेन राजाच्या सत्यवान नावाच्या पुत्रावर अनुरक्त असते. सत्यवान हा अत्यंत गुणवान असतो परंतु त्याच्या वडिलांचे राज्य हरण झालेले असते. तो आपल्या अंध आणि वृद्ध आई वडिलांच्या सह एका जंगलाच्या जवळ निवास करत असतो. जंगलातील लाकडे तोडून तो उदरनिर्वाह करत असतो. अश्या परिस्थितीने गांजलेल्या परंतु अत्यंत गुणवान अश्या सत्यवानावर सावित्री प्रेम करत असते आणि त्याच्याशी विवाह करण्याची तिची इच्छा असते. नारदमुनी सावित्रीची भेट घेऊन तिला कल्पना देतात की ज्याच्याशी तू लग्न करण्याचे स्वप्न पहात आहेस त्याच्या नशिबात विवाहाच्या नंतर एका वर्षात मृत्यूयोग आहे. हे सत्य अवगत झाल्यावर सुद्धा सावित्री सत्यवानाशी विवाह करण्यावर ठाम रहाते.


विवाहाच्या नंतर सावित्री आपल्या अंध आणि वृद्ध सासू सासर्यांची सेवा करत पतीसह छोट्याश्या झोपडीत आनंदाने राहू लागते. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होईल असे नारदाने सांगितलेले असते त्या दिवशी ती स्वतः सत्यवानाच्या बरोबर जंगलात जाते. सत्यवान मूर्च्छित होतो आणि सावित्री वडाच्या झाडाखाली त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन बसते त्यावेळी तिथे यम येतो आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो. त्यावेळी सावित्री यमाच्या मागोमाग कारण देह धारण करून जाऊ लागते. 


यम तिला थांबवतो आणि तू प्रकृतीच्या नियमात फेरफार करू शकत नाहीस हे बजावतो. त्यानंतर सावित्री आणि यमाचा शास्त्रार्थ होतो. या शास्त्रार्थात ती यमाला पराभूत करते आणि त्याबद्दल यम तिला तीन वरदान प्रदान करतो पण सत्यवानाचे प्राण मागणार नाहीस हे वचन घेतो. पहिल्या वरदानात सावित्री यमाकडे आपल्या अंध सासू सासर्यांच्या साठी नेत्र मागते. दुसऱ्या वरदानात ती यमाकडे आपल्या सासर्यांना त्यांचे गेलेले राज्य परत मिळावे म्हणून वरदान मागते आणि तिसऱ्या वरदानात ती यमाकडे १०० पुत्रांचे वरदान मागते. अर्थात शंभर पुत्रप्राप्तीसाठी सत्यवानाचे प्राण परत करणे यमाला भाग पडणार असते.


अश्या रीतीने सावित्री यमाच्या तावडीतून आपल्या पतीचा जीव वाचवते आणि त्याला दीर्घायुष्य मिळून देते. या घटनेत सावित्री वडाच्या झाडाखाली बसली होती म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याची दीर्घायुष्याचे प्रतिक म्हणून तातू गुंडाळण्याची प्रथा आहे. या दिवसाच्या बद्दल सावित्रीला पूर्व कल्पना असल्याने ती त्या दिवसाच्या पूर्वी तीन दिवस पूर्ण कठोर उपवास करते. त्या मुळे आज स्त्रिया या दिवशी उपवास करतात.    


या कथेतून आपण काय बोध घेऊ शकतो ते सांगतो. 


१) पराकोटीची गुणवान, बुद्धिमंत आणि सुंदर असणारी सावित्री मनोवांच्छित वर हा त्याच्या गुणांवर निवडते. आर्थिक दृष्ट्या तो विपन्न अवस्थेत आहे. परंतु ती त्याचे गुण पाहून त्याला स्वीकारते. अर्थात गुणग्राहकता. केवळ पैसा आणि लग्नाच्या नंतर राहण्याचे ठिकाण या गोष्टीला प्रमाण मानून लग्न ठरवण्याचा विचार करणाऱ्या मुलींनी हा मुद्दा निश्चित विचारात घेतला पाहिजे. 


२) त्याच्या अपमृत्यूच्या बद्दल तिला पूर्वकल्पना नारदमुनी देतात तरीही तिचा निश्चय अढळ रहातो. आपल्याकडे एक प्राचीन नियम असे. कोणीही तपस्या करून ईश्वरी शक्तीला वरदान मागताना गुणवंत पुत्र किंवा कन्या मागितली तर त्याला गुणवान अपत्य अल्पायु असेल आणि निर्बुद्ध अपत्य दीर्घायू असेल असाच ऑप्शन दिला जाई आणि दरवेळी प्रत्येकाने अल्पायु परंतु गुणवान अपत्याचीच मागणी केली आहे.. याला गुणवत्तेला महत्व देणे. किंवा quality is more important than quantity हे दिसून येते. गुणहीन व्यक्तीसह आयुष्य व्यतीत करणे आणि गुणवान व मनोवांच्छित व्यक्तीसह एकच वर्षाचे वैवाहिक सुख प्राप्त करणे यातील दुसरा पर्याय सावित्री निवडते ही गोष्ट एक व्यक्ती म्हणून तिचा दर्जा दर्शवते.   


आता हेच धाडस हीच मानसिकता आपल्या कडे पोलीस खात्यात, सैन्यदलात काम करणाऱ्या पुरुषांना आपला पती म्हणून निवडणाऱ्या मुलींची असते. त्या दृष्टीने त्या सुद्धा सावित्रीच्या इतक्याच आदरणीय आहेत. म्हणूनच श्री मुकाम्बिका वरदिव्यसहस्त्रनामात वीरपत्नी आणि वीरमाता या दोघीही जणी मृत्योपरांत वीरलोकात निवास करण्याच्या अधिकारी आहेत आणि त्यांचा त्याग सुद्धा वीराच्या इतकाच श्रेष्ठ आणि थोर आहे असा उल्लेख केला आहे. 


३) अश्वपती राजाचा उल्लेख राजर्षी असा केला आहे. अर्थात तो एक श्रेष्ठ राजा होता. त्याची कन्या अश्या प्रकारे राजकुलातील परंतु कफल्लक असलेल्या सत्यवानाला पती म्हणून स्वीकारते तरीही तिचे आई वडील तिला विरोध करत नाहीत. ना गरीब सत्यवानाच्या घरात आपली मुलगी कशी राहील हा विचार करून तिला आर्थिक बळ प्रदान करण्याचा प्रयास करतात. आपल्या मुलीच्या जीवनात आणि प्रपंचात ढवळाढवळ न करण्याची जी परिपक्वता सावित्रीचे आईवडील दाखवतात ती आजच्या मुलामुलींच्या पालकांनी सुद्धा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. 


४)  सावित्री यमाशी शास्त्रार्थ करते, त्याला निरुत्तर करते आणि त्याच्याकडून आपल्या पतीचे प्राण पुनश्च प्राप्त करते यात ती सुशिक्षित, ज्ञानी आणि बुद्धिमान होती हे सिद्ध होतेच. त्यामुळे स्त्री गौण आहे, तिला शिक्षण दिले जात नसे छाप विषारी प्रचार किती पूर्वग्रहदुषित आहे हे यातून सिद्ध होते. सावित्रीच्या बुद्धिमत्तेला जाणून घेणे खूप आवश्यक आहे.ती यमाला प्रथम आपल्या अंध आणि वृद्ध सासू सासऱ्यांच्या साठी नेत्र मागते. अर्थात जर तिला सत्यवानाबरोबर सहगमन करायची वेळ आली तरी आपल्या सासू सासऱ्यांना नेत्र असणे अत्यंत आवश्यक होते. दुसऱ्या वरदानात ती त्यांचे राज्य मागते अर्थात यावेळी सुद्धा विचार तोच आहे की आपण जर पतीचे प्राण वाचवण्यात अपयशी झालो तर तरीही आपल्या सासू सासऱ्यांना उर्वरित आयुष्य सुखात व्यतीत करता येईल. तिसर्या वरदानात ती अप्रत्यक्ष रित्या यमाला शब्दात अडकवून त्याच्याकडून पतीचे प्राण पुनश्च परत मिळवते. सर्वप्रथम संपूर्ण कुटुंबाचा विचार ही आपली प्राचीन परंपरा सावित्री निर्वहन करताना दिसते. न्यूक्लीयर family या नावाखाली आपण आपली कुटुंबव्यवस्था उध्वस्त करून टाकतो आहोत याची आपल्या कुणालाच खंत वाटत नाही हा सुद्धा एक लज्जास्पद भाग आहे. 


५) आपले सणवार व्रतवैकल्ये केवळ आपल्याला अन्नातील बदल किंवा एक दिवस लंघन करण्याच्या साठी सांगितलेली कथा नाही. त्यामागे आपल्याला प्रेरणा देऊ शकेल आपल्या संस्कृतीमधील सकारात्मकता समजेल इतकेच नाही तर आपल्याला नैतिकतेचे आणि मानवतेचे उत्कृष्ट जीवनमूल्ये सांगू शकेल असे तत्वज्ञान असते. ते तत्वज्ञान आपण आत्मसात करणे अभिप्रेत आहे. त्याची सवंग टिंगल उडवणे हे छपरीपणाचे लक्षण आहे. याचा प्रत्येक हिंदूने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.  


६) आज जन्मोजन्मी हाच पती ही जी संकल्पना मांडली जाते आहे, किंवा सप्तजन्मी हाच पती ही जी संकल्पना मांडली जाते आहे तिच्या मागील विचार सांगतो. प्राचीन काळात शतायुषी होणे हे ध्येय मानले जाई. विवाह तारुण्यात होतो, मग पतीपत्नी म्हणून आमचे सहजीवन कमीतकमी ऐंशी ते शंभर वर्ष असावे ही कामना त्यामागे होती. याचे कारण असे की मानवी देह पूर्णांशाने बारा वर्षात पुनरुज्जीवित होतो, म्हणून १२ X ७ =८४ अर्थात अश्या सप्त जन्म मला या पतीचा सहवास लाभावा हा भाव होता. अर्थात मला स्वतःला आणि माझ्या पतीला निरोगी राहून शतायुषी होता यावे आणि त्या संपूर्ण कालखंडात मला त्याचा भरभरून सहवास लाभावा ही कामना होती. 


७) साक्षात यमधर्माशी शास्त्रार्थ करून आपल्या पतीचे प्राण वाचवणारी सावित्री ही त्या दृष्टीने बेंचमार्क. त्या घटनेचे प्रतिक म्हणजे वटवृक्ष तो सुद्धा अत्यंत दीर्घायू म्हणून प्रसिद्ध आहे. मग त्याला तातू गुंडाळणे हे त्या भावनेचे प्रकटीकरण होते.     


या उदात्त विचाराची थट्टा उडवणारा पुरुष अथवा स्त्री यांना पतीपत्नी या नात्याचे परस्परपुरकत्वच समजले नाही असे मला अत्यंत खेदाने नमूद करावे लागते आहे. 


माझे विचार पटले असतील तर हा लेख अवश्य प्रसारित करा. 


© सुजीत भोगले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा