बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

part 5

*सहा सोनेरी पाने*
*स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर*
भाग-५
*भारताची तत्कालीन व्याप्ती*

दोन अडीच हजार वर्षापूर्वी सिंधू नदीच्या पलिकडे अगदी इराणच्या सीमेपर्यंत भारतीयांची वस्ती आणि राज्ये पसरलेली होती.
हिंदूकुश पर्वताला ग्रीक परोपनिसस(Paropnisus) म्हणत. आजचे अफगाणिस्थान तेव्हां *गांधार* होते. काबूल नदीचे आपले प्राचीन नाव *कुभा* होते. हिंदुकुश पर्वतापासून सिंधू नदी समुद्राला जेथे मिळते तेथपावेतो, तिच्या दोन्ही काठांना वैदिक धर्मानुयायी भारतीयांची लहान मोठी स्वतंत्र राज्यांची मालिका पसरलेली होती. ही बहुतेक राज्ये लोकसत्ताक पध्दतीची प्राजके(Republics) होती. त्यांना गणराज्ये म्हणत. राजसत्ताक पध्दतीची दोन/तीनच राज्ये होती त्यातील पौरव राजाचे राज्य सगळ्यात मोठे होते.
ग्रीक पुराणाचा आधार घेतला तर, त्यात अस म्हटल गेलय की, सिंधुपलीकडील गांधार प्रांतातून भारतातील आर्यवंशी जानपदाची एक तुटक शाखा ग्रीसकडे गेली. अलेक्झांडरचे सैन्य जेव्हां या भागात आले तेव्हां, स्वत:ला ग्रीक समजणारा एक लहानसा समुह त्यांना आढळला. अलेक्झांडरलाही आपल्या प्राचीन पूर्वजांचे हेच मूळ ठिकाण असे वाटले. ग्रीक सैन्याला आपल्या पितृभूमीचे दर्शन झाल्याचा इतका अत्यानंद झाला की युध्द बंद करून त्यांनी महोत्सव साजरा केला. ग्रीकांच्या देवतांचे, वैदिकांच्या देवतांशी अत्यंत सादृश्य होते. खूप साम्य होते. देवतांच्या नावाचे उच्चार अपभ्रंशामुळे वेगळी वाटत इतकेच. ग्रीकही यज्ञे, हवने करीत. ग्रीकांना आयोनियन्स म्हणत. *आयोनियन्सवरून यवन* शब्द पडला.
 ययातीचा पुत्र अनु ह्याचेच ग्रीक लोक वंशज असतील का ? 😊 अन्वायन-आयोनियन अशी अपभ्रष्ट रूपे होत गेली असतील का ? हा संशोधनाचा विषय आहे, संशोधकांनाच सोडवू दे. 

परंतु *ग्रीक म्हणजेच यवन. मुसलमान किंवा सर्वच परराष्ट्रीय आक्रमकांना यवन म्हणणे चूकीचेच.*
आणखी एक खुलासा इथे करावासा वाटतो.
गांधारपासून पंचनद(पंजाब) पर्यंत, तेथून सिंधू नदी समुद्रास मिळते तेथपर्यंत, ज्या ज्या भागात अलेक्झांडरचा संचार झाल्याची वर्णने ग्रीक लेखकांनी केली आहेत त्यात वैदिक धर्मानुयायांचे उल्लेख आहेत, परंतु बुध्द किंवा बुध्दपंथाचा चुकूनसुध्दा उल्लेख नाही. यावरून बुध्दाच्या मृत्यूनंतर २५०/३०० वर्षापर्यंत मगध प्रांतातच बुध्दपंथाचा प्रसार झाला होता, त्यापलिकडे त्याचे पाऊलही पडलेले नव्हते हे स्पष्ट होते. पुढील इतिहास बघताना ही बाब लक्षात ठेवावी लागेल.
(क्रमश:)
              रविकांत करंदीकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा