बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

saha soneri pane part 7

*सहा सोनेरी पाने* 
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.*
भाग-७

तक्षशिलेचा राजा *अंबुज(अंभी)* याने अलेक्झांडरचे मांडलिकत्व, *पौरस राजाचा* बिमोड करण्यासाठी स्वीकारले. नंतर *पौरस राजाचा* पराभव, पौरसाने अलेक्झांडरला दिलेले बाणेदार उत्तर, अलेक्झांडरने दाखवलेला दयाळूपणा, वगैरे इतिहास मोठ्या हुशारीने आपल्याला शाळेतील इतिहासात तेव्हांच्या शिक्षण तज्ञांनी शिकवला आहेच. अलेक्झांडरचे भाट असलेल्या तत्कालीन ग्रीक इतिहासकारांनी तो प्रसंग तसा लिहीला आणि पाश्चात्यांचे भाट असलेल्या आमच्या शिक्षण तज्ञांनी(?😡) तो भाग तसाच्या तसा उचलून आम्हाला शिकवला.
पौरसाला त्याचे राज्य परत देण्या मागची खरी मेख वेगळीच होती. अलेक्झांडरसाठी ती राजकीय अपरिहार्यता होती.
स्वप्नात राज्य दिले म्हणून जागेपणीही राज्य देऊन टाकायला अलेक्झांडर कोणी भाबडा,सत्यवचनी वगैरे राजा नव्हता.
अलेक्झांडरचे लक्ष्य त्या काळातील, भारतातील सर्वात मोठे व शक्तिशाली राज्य मगध आणि त्याची राजधानी पाटलीपुत्र हे होते. जर पौरसाला ठार मारले, किंवा पदच्युत करून आपला कोणी क्षत्रप(त्याला ग्रीक राज्यपाल किंवा गव्हर्नर म्हणता येईल)त्या राज्यावर बसवला तर, त्या राज्यातील स्वाभिमानी भारतीय जनता ग्रीकांच्या द्वेषाने खवळण्याची शक्यता जास्त होती. त्याचा शिकंदराला त्रासच झाला असता. त्यामुळे कौतुक, दयाळूपणा वगैरे ग्रीकांनी लिहीलेल्या भाकड कथा आहेत हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.
हे सगळ चालू असताना, त्यावेळी आणखी थोड वेगळ काय घडत होत ते पाहूया.
अलेक्झांडर भारतावर स्वारी करण्याच्या फार पूर्वीपासून संपूर्ण जगात भारतातील काही विद्यापीठे खूप प्रसिध्द होती. त्यापैकी एक म्हणजे तक्षशिला विद्यापीठ. देशोदेशीचे विद्यार्थी एवढेच नव्हे,तर परदेशी राजपुत्रही या विद्यापीठात राज्यशास्त्र, युध्दशास्त्र यांचे शिक्षण घेत असत. 
योगायोगाने अलेक्झांडरने भारतावर चाल करून तक्षशिला ताब्यात घेतली तेव्हां, एक तेजस्वी, तरतरीत तरूण या विद्यापीठात शिक्षण घेत होता किंवा नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडला होता. त्याला राज्यशास्त्राचे, राष्ट्रीय क्रांतीकार्याचे शिक्षण देत होते एक प्रौढ पंडित. 
शिकंदराच्या स्वारीच्या हलकल्लोळात ही सामान्य दिसणारी, दोन असामान्य माणसे कोणाच्याही नजरेत भरलेली नव्हती.
शिकंदर जेव्हां भारतातील रावरावळांचे, राजा महाराजांचे मुकुट एकत्र करून, वितळवून स्वत:साठी, भारतीय सम्राटपदाचा महामुकुट तयार करण्याचे स्वप्न बघत होता तेव्हां, आयताच तयार होणारा तो मुकुट त्याच्याकडून हिसकावून घेऊन, आपल्या तरूण शिष्याच्या डोक्यावर कसा ठेवता येईल याच्या योजना जे प्रौढ आचार्य मनोमन करीत होते, ते होते, *आचार्य चाणक्य.*
(क्रमश:)
                  रविकांत करंदीकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा