"मराठा तितुका मेळवावा |
महाराष्ट्र धर्म वाढवावा ||"
उपरोक्त श्री.समर्थ रामदास स्वामींच्या वचनातील 'मराठा' व 'महाराष्ट्र धर्म' ही संकल्पना व्यापक अर्थाने कथन केली गेली आहे.या ठिकाणी 'मराठा' हा शब्द जातिवाचक म्हणून योजिलेला नसून,तो महाराष्ट्रातील मराठा,ब्राह्मण,इतर बिगर-मराठा अठरापगड जाति-जमाती आदी सर्वसमावेशक अशा महाराष्ट्रातील तमाम रयतेला म्हणून संबोधण्यात आलेला आहे.
याचबरोबर 'महाराष्ट्र धर्माची' व्याप्ती अमर्यादित,अनंत स्वरूपाची आहे.यात महाराष्ट्राचा इतिहास,भूगोल,संस्कृती,प्रथा-परंपरा,भाषा-बोलीभाषा,आचार-विचार,पेहराव,वर्ण-धर्म-कर्म,जाति-उपजाति यांचा असा सर्वसमावेशक संयोग म्हणजेच- ' महाराष्ट्र धर्म '. देशधर्म,देवधर्म-कुलधर्म,वंशधर्म या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजेच ' महाराष्ट्र धर्म '.सारे भेदभाव दूर व्हावेत,लोकांमध्ये एकीची भावना निर्माण होऊन अवघा ' मराठा ' एक व्हावा व परकीय दास्याची बेडी मोडीत काढून महाराष्ट्राला गतकाळातील वैभव प्राप्त करून देणे व पुन्हा एकदा रामराज्याची प्रतिष्ठापना करणे,हे समर्थांना अभिप्रेत होते.म्हणूनच या विचारावर भर देण्यासाठी ते म्हणतात की,
बहुत लोक मेळवावे | एक विचारे भरावे |
कष्ट करूनि घसरावे | म्लेंच्छावरी ||
देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा |
मुलुख बडवा की बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||
जय जय रघुवीर समर्थ !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा