बुधवार, ५ मार्च, २०१४

Mudra Bandh मुद्रा आणि बंध




मुद्रा आणि बंध
योगशास्त्रामध्ये मुद्रा आणि बंध हे यौगिक प्रकार अतिशय परिणामकारक आणि त्यामुळेच श्रेष्ठ गणले जातात. यांच्या नियमित अभ्यासाने साधकास अलौकिक शक्ती प्राप्त होऊ शकते आणि म्हणुनच या प्रकाराचे तंत्र जपुन अंगी बाणवावे, योग्य गुरुकडुनच त्याची दिक्षा घ्यावी असे अनेक योगग्रंथांमध्ये म्हटले आहे. मुद्रा आणि बंध अधिक परिणामकारक ठरतांत कारण मुद्रा आणि बंध यांचा संबंध मुख्यत्वेकरुन शरीरातील नाडी-केंद्रे, प्रमुख नाड्या आणि अंत:स्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands) यांच्याशी येतो. म्हणुनच त्यांच्या योग्य अभ्यासाचा परिणाम (आणि अयोग्य अभ्यासामुळे दुष्परिणाम) शरीर, मन,भावना यांच्यावर त्वरीत आणि आणि अधिक तीव्रतेने होतो. याच कारणास्तव मुद्रा आणि बंध यांच्या अभ्यासाविषयी साधकाने अधिक सजग राहावयास हवे.
मुद्रा म्हणजे प्रतिक किंवा anand दायक स्थिती. बंध म्हणजे 'रोखणे' अथवा 'बंधनात अडकवणे' किंवा "नियंत्रण ठेवणे'. अनेक वेळा मुद्रा आणि बंध यांचा अभ्यास एकत्रितपणे केलेला दिसतो. अनेक आसनांमध्येही मुद्रा आणि बंध यांचा समावेश केला गेला आहे. परंतु बंध हा प्रकार स्वतंत्रपणेदेखिल केला जाऊ शकतो. बंधांचा अभ्यास करतांना श्वसनप्रक्रियेवर अनेक प्रकारांनी नियंत्रण आणले जाते. त्यामुळे बंध हा प्राणायामध्ये खूप प्रभावीपणे वापरला जातो. विशेषत: 'कुंभक' स्थितीमध्ये (प्राणायामामधिल "श्वास रोखुन धरण्याची स्थिती") बंधांचा वापर अत्यंत परिणामकारक ठरतो.
मस्तकीय मुद्रा, काया मुद्रा, हस्त मुद्रा, अधर मुद्रा व बंध हे मुद्रांचे प्रकार आहेत. ब्रह्म, योग, सिंह, शांभवी, काकी या काही महत्वाच्या मुद्रा व महा, उड्डियान, जालंधर, मूल वगैरे काही मह्त्वाचे बंध. 
बंधाचे तीन प्रमुख प्रकार म्हणजे जालंदर बंध, उड्डीयान बंध आणि मूलबंध. हे तिन्ही बंध जेव्हा एकत्रितपणे वापरले जातात त्यास्थितीला महाबंध असे नांव दिले आहे. याखेरीज जिव्हाबंध हा आणखी एक बंध अभ्यासला जातो. हे बंध कशाप्रकारे अभ्यासावेत, यावेळी कुठली काळजी घ्यावी, बंधांचे फायदे आणि त्यांच्या मर्यादा याविषयी आपण माहिती करुन घेऊया.
१. जिव्हाबंध
पद्मासन, वज्रासन , सुखासन अथवा कुठल्याही ध्यानासनात बसावे. यापैकी कुठलेही आसन जमत नसल्यास खुर्चीत बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. जिभेचा शेंडा वरच्या जबड्याच्या आतील बाजुस म्हणजे पुढील दातांच्या मुळाशी हिरड्यांना चिकटवुन ठेवावा. आता संपूण जीभ टाळ्याला लावावी. (साधारणपणे या अवस्थेमध्ये जीभ पटकन सोडल्यास 'ट्टॉक' सारखा आवाज येतो). मग नजर नासिकाग्रावार अथवा भ्रुमध्यावर स्थिर करुन जबडा संपूर्ण उघडावा. या अवस्थेत जिभेखालील स्नायुबंध ताणला जाऊन ताठ उभा राहील. साधारण ३-५ दीर्घ श्वासोच्छ्वासापर्यंत ह्या स्थितीत रहावे. अंतिम स्थितीतुन बाहेर येताना तोंड मिटुन जीभ सैल सोडावी आणि नेहमीच्या स्थितीत आणावी.
प्राणायामात या बंधाचा उपयोग अभ्यंतर कुंभक (श्वास आत घेऊन रोखुन धरणे) किंवा बाह्य (शून्य) कुंभक (श्वास बाहेर सोडुन रोखुन धरणे) या अवस्थांमधे करता येतो.
या बंधाचे लाभ कोणते आहेत ते पाहु.
१. कंठाच्या आणि मानेच्या स्नायू सुदृढ होण्यास मदत होते.
२. घसा आंबणे (sore throat) अथवा घसा फाटणे (throat hoarse) यासारख्या घशांच्या व्याधींवर हा बंध उपयुक्त ठरु शकतो. प्राध्यापक, गायक ,नट ई. मंडळींना या बंधाचा विशेष उपयोग होऊ शकतो.
३. जिभेवर आणि जिभेखालच्या स्नायुबंधावर ताण येतो त्यामुळे जिभेचे जडत्व नाहिसे होण्यास मदत होते. काहीवेळेस तोतरेपणावर देखिल हा बंध ईलाज ठरु शकतो.
४. Carotid Body आणि Sinus Nerve उत्तेजित झाल्याने रक्तदाबावर नियंत्रण होण्यास मदत होते.
५. कंठस्थ ग्रंथी (Thyroid & Parathyroid Glands) त्यांचे कार्य संतुलित होते.
६. लालोत्पादक ग्रंथीं (Salivary Glands) अधिक कार्यक्षम झाल्याने त्याचा फायदा पचनसंस्थेला होतो.
७. चेहर्‍याच्या स्नायुंना व चेहर्‍यावरील त्वचेला चांगलाच व्यायाम मिळाल्याने त्यांचे रक्ताभिसरण वाढते, जेणेकरुन चेहरा तजेलदार होण्यास मदत होते.
या बंधाचे दुष्परीणाम नसल्याने कोणिही व्यक्ती हा बंध करु शकते. अगदी ऑफिसमध्ये खुर्चीत बसल्या बसल्या देखिल हा बंध करु शकता.
आता पुढील बंध पाहू तो म्हणजे जालंदर बंध
जालंधर बंध करताना पद्मासन अथवा सिद्धासनाची बैठक असावी. ते शक्य नसल्यास खुर्चीवर बसुन देखिल हा बंध अभ्यासता येईल. पाठीचा कणा व मस्तक सरळ रेषेत ताठ ठेवावे. दोन्ही तळवे गुडघ्यांवर ठेवावे. डोळे बंद करुन शरीर शिथिल करावे. आता धिम्या गतीने दीर्घ श्वास घ्यावा. श्वास उदरपोकळी आणि छातीमधे भरुन झाल्यावर रोखुन धरावा (अभ्यंतर कुंभक). मस्तक खाली अशा रितीने झुकवावे की हनुवटी मानेखालील खळग्यामध्ये (jugular notch) रुतुन बसेल. या अवस्थेमधे खांदे किंचित पुढे झुकवून हात कोपर्‍यात सरळ करावेत जेणेकरुन मानेवर पडणारा दाब वाढेल. ही झाली जालंधर बंधाची अंतिम अवस्था. या अवस्थेमध्ये आपल्याला झेपेल ईतका वेळ रहावे, उगीच अट्टाहासाने जास्त वेळ श्वास रोखुन ठेवु नये.
बंधामधुन बाहेर येताना हात कोपरात वाकवा, खांदे मागे आणा. मस्तक हळुवार पणे मागे उचला आणि श्वास धिम्या गतीने सोडा. श्वासोच्छवासाची गती नियमित होईस्तोवर डोळे बंद ठेवुन लक्ष श्वासांवर केंद्रित करा. श्वास नियमित झाल्यावर पुन्हा बंधाचा अभ्यास करु शकता. साधारणपणे ३-५ वेळा जालंधर बंधाचा अभ्यास करावा.
या बंधाचा अभ्यास बाह्य कुंभका मधेही करता येतो (श्वास पूर्णपणे बाहेर रोखुन).
या बंधाचे फायदे आता पाहू.
१. या बंधामुळे Carotid Sinus वर दाब पडतो. Carotid Sinus रक्ताभिसरण आणि श्वसन संस्था यांचे कार्य नियंत्रण करते, जसे रक्तामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायाक्सोईड्चे प्रमाण वाढल्यास ह्रदयगती वाढते आणि श्वास जड होतो. Carotid Sinus वर जालंधर बंधाद्वारे कृत्रिमरित्या दाब दिल्याने हृदयगती मंद होऊन श्वास नियमित होण्यास मदत होते.
२. कंठस्थ ग्रंथी (Thyroid & Parathyroid Glands) या कार्यान्वित राहत असल्याने त्यांचे कार्य संतुलित होते.त्यामुळे ताण-तणाव, चिंता आणि क्रोध कमी होऊ लागतात.
हा बंध कोणी करु नये ? ज्यांना Cervical spondylosis चा त्रास आहे अशा व्यक्तिंनी हा बंध टाळावा. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशा व्यक्तींनी तसेच उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी हा बंध टाळणे ईष्ट. कारण श्वास जास्त काळ कुंभक केल्याने हृदयावर ताण येऊ शकतो. या बंधाचा अभ्यास जाणकार व्यक्तीसोबत करावा ही विनंती.
याच्या पुढील बंध म्हणजे उड्डीयान बंध. सर्व बंधामध्ये हा कठीण पण तितकाच महत्वाचा बंध मानला जातो. "मृत्यु मातंग केसरी" (हत्तीरुपी मृत्युस मात देणारा सिंहरुपी बंध) असे या बंधाचे वर्णन केलेले आढळते. या बंधाच्या सततच्या अभ्यासाने वृद्ध देखिल तरुण होतो असा उल्लेख हठप्रदिपिकेमध्ये केलेला दिसतो.
उड्डीयानं तु सहजं गुरुणा कथितं सदा । अभ्यसेत् सततं यस् तु वृद्धोपि तरुणायते ॥५८॥
नाभेर् ऊर्ध्वम् अधश् चापि तानं कुर्यात् प्रयत्नतः । षण्मासम् अभ्यसेन् मृत्युं जयत्य् एव न संशयः ॥५९॥
सर्वेषाम् एव बन्धानां उत्तमो ह्य् उड्डीयानकः । उड्डियाने दृढे बन्धे मुक्तिः स्वाभाविकी भवेत् ॥६०॥
उड्डीयान म्हणजे "उड्डाण" !! हा बंध केला असता प्राणरुपी पक्षी वर उडतो, म्हणुन या बंधाला उड्डीयान बंध असे संबोधले आहे. शरीरशास्त्राच्या दृष्टीने पाहिले असता, या बंधाच्या अभ्यासादरम्यान पोटामधले अवयव वर उचलले जातात, म्हणुन उड्डीयान हे नांव समर्पक आहे.
उड्डीयान बंधासंबंधी अधिक माहिती जाणुन घेण्याआधी हा कठीण बंध सोपा जावा याकरता एका पूर्वाभ्यासाची तयारी केल्यास उत्तम, तो म्हणजे "तडागी मुद्रा". तडागी मुद्रा केल्याने उड्डीयान बंध करणे अधिक सुलभ होते असा अनुभव आहे.
तडागी मुद्रा करण्याकरता पाठीवर झोपावे. शरीर अगदी शिथिल सोडावे. हात शरीराच्या दोन्ही बाजुस शरीराजवळ ठेवावेत. आता पाय गुडघ्यात दुमडुन शरीराजवळ घ्यावेत पण नितंबांपासुन साधारण एक फूट अंतरावर ठेवावेत. पायांमध्ये साधारण एक-दीड फूट अंतर ठेवुन तळवे जमिनीवर राहतील असे बघावे, संथ लयीत श्वासोच्छवास करावा. आता छाती आणि उदरपोकळी भरेल ईतका दीर्घ श्वास घ्यावा आणि मग संथपणे संपूर्ण श्वास बाहेर काढावा. उजव्या हाताने दोन्ही नाकपुडया गच्च दाबुन धराव्या आणि तोंड न उघडता श्वास घेण्याचा प्रयत्न करावा. (Mock Inhalation) यामुळे पोटात खड्डा पडल्याची अवस्था प्राप्त होते. एखाद्या तलावासारखाच (तडाग) पोटाचा आकृतीबंध होतो म्हणुन याला "तडागी मुद्रा" असे संबोधले जाते, आपल्याला शक्य होईल ईतकाच वेळ या अवस्थेमध्ये रहावे आणि मग सावकाश श्वास घ्यावा. हात आणि पाय सरळ करुन डोळे बंद करावेत आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करावे जोपर्यंत श्वास नियमित होत नाही.
तडागी मुद्रेचा सराव नियमित केल्याने उदरपोकळीमधिल स्नायुपटल लवचिक होते आणि मग उड्डीयान बंध करण्यात सहजता प्राप्त होते. तडागी मुद्रेचा अभ्यास सहजतेने (आणि सजगतेने) करता येऊ लागला की उड्डीयान बंधाचा अभ्यास करण्यास हरकत नाही.
दोन्ही पायात साधारण एक ते दीड फूट ईतके अंतर घेवुन॑ सरळ उभे रहावे. कमरेपासुन मानेपर्यंत शरीरास बाक देवुन पुढे झुकावे. दोन्ही हातांचे तळवे गुढघ्यावर ठेवावे. हातांची बोटे गुडघ्याच्या आतील अथवा बाहेरील बाजुस आपल्या सोयीनुसार ठेवावीत. यास्थितीमध्ये पोट शिथिल सोडावे.
आता दीर्घ श्वास घ्यावा. मग छाती आणि पोट यांचे आकुंचन करुन सर्व श्वास बाहेर सोडुन द्यावा. हातांचा दाब मांड्यांवर दिल्यास पोट अधिक आकुंचित होण्यास मदत होईल. यास्थितीत जालंधर बंध लावावा. (हनुवटी मानेखालच्या खळग्यात अडकवावी), त्यामुळे श्वास बाहेर रोधण्यास मदत होईल. आता श्वास आत घेण्याचे नाटक करावे (Mock Inhalation) म्हणजे छातीमध्ये पोकळी निर्माण होउन त्याठिकाणी ऋण दाब (Negative Pressure) तयार होईल. या ऋण दाबामुळे पोटातील सर्व स्नायु, उदरपटल (Diaphragm), Abdominal Wall ईत्यादी भाग छातीच्या पोकळीत आत खेचले जातील आणि पोट खपाटीस जाईल. ही उड्डीयान बंधाची अंतिम स्थिती आहे.
या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार रहावे. बंधातुन बाहेर येताना पोट शिथिल करावे. नंतर हाताचा दाब सैल करावा. हनुवटी सैल करुन जालंदर बंध सोडावा.नंतर नियंत्रित रितीने श्वास घ्यावा. सरळ उभे रहावे आणि श्वासोच्छवास नियमित होईपर्यंत हात कमरेवर ठेवुन आरामदायी स्थितीत उभे रहावे. अशा रितीने उड्डीयान बंधाचे एक आवर्तन पूर्ण होते. उड्डीयान बंध हा पद्मासनामध्ये बसुन देखिल करता येतो. हा बंध केवळ बाह्य कुंभकावस्थेमध्येच करावा. पोट रिकामे असतांना म्हणजे मलमूत्र विसर्जनानंतर या बंधाचा अभ्यास करावा.


पोटदुखी, अशक्त छाती, हार्निया, अपेंडीसायटीस, अल्सर, उच्च रक्तदाब, हृदय रोग अशा व्याधी असलेल्या व्यक्तींनी हा बंध टाळणे हितकारक. महिलांनी गर्भावस्थेत हा बंध वर्ज्य करावा.
या बंधाचे लाभ
१. उदरपोकळीतील सर्व अंगांचे आरोग्य या बंधामुळे सुधारते. त्यामुळे पचनक्रिया मलावरोध णि उत्सर्जनक्रिया अधिक कार्यक्षम होतात. अपचन, गॅसेस, मंदाग्नी, मलावरोध ई. दोष नाहिसे करण्यास हा बंध उपयोगी ठरतो.
२. Adrenal Glands आणि Gonad Glands यांच्यावर दाब आल्याने त्यांचे कार्य उत्तम रितीने चालते. Andrenilin च्या निर्मितीमुळे साधकाला उत्साह आणि स्फुर्ती प्रदान करतो.
३. उदरपटल (Diaphragm) वर ऋण दाब आल्याने ते अधिक लवचिक बनते. त्यामुळे श्वसनक्रिया अधिक सुकर होते. दम्याच्या विकारात या बंधाचा अभ्यास लाभदायक ठरु शकतो.
४. पुरुषांमधिल वीर्यदोष तसेच स्त्रियांचे काही आजार यावर हा बंध उपयोगी ठरु शकतो.
५. या बंधाचा अभ्यास नौलीक्रिया साधण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.
मुद्रांमधील एक महत्वाची मुद्रा म्हणजे विपरीत करणी मुद्रा.
विपरीत करणी मुद्रेमध्ये खाली डोके वर पायअशी शरीराची स्थिती असते. झोपणे सोडले तर एरवी आपली खाली पाय वर डोकेअशीच स्थिती असते. मात्र, या यौगिक प्रकारात नेहमीपेक्षा वेगळी म्हणजेच विपरीत’ (खाली डोके वर पाय) अशी शरीराची स्थिती होते. म्हणूनच या मुद्रेचे नाव विपरीत करणी मुद्राअसे आहे. रक्ताभिसरण क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठी, हृदयाकडे योग्य प्रमाणात अशुद्ध रक्त वाहून नेण्याच्या महत्त्वाच्या क्रियेसाठी या मुद्रेचा उपयोग होतो.
सावधानता : तीव्र डोकेदुखी, उच्च रक्तदाब व पोटातील स्नायू दुर्बल असल्यास ही मुद्रा करू नये.
पूर्वस्थिती : पाठीवर झोपलेल्या स्थितीत, दोन्ही पाय एकमेकांजवळ घेऊन पावले, घोटे, गुडघे एकमेकांना चिकटवून ठेवावेत. हाताचे तळवे पालथे ठेवून हात शरीराच्या बाजूला मांड्यांजवळ ठेवावेत.
कृती : दोन्ही पाय हळूहळू उचलून वर न्यावेत. पोटाच्या स्नायंूचे अधिक आकुंचन करून, पाय डोक्याच्या बाजूस नेऊन खाली झुकवावेत. नंतर पार्श्वभाग, कंबर उचलून पाय डोक्याच्या दिशेने अजून खाली येऊ द्यावेत. ज्या क्षणी सहजपणे तोल साधेल त्या वेळी हात कोपरात दुमडावेत. कोपर जमिनीवरच ठेवून हात वर न्यावेत आणि कमरेजवळ हाताच्या तळव्यांनी आधार द्यावा. त्या आधाराने पाय हळूहळू वर न्यावेत आणि सरळ करावेत. पायांचा सर्व भार हाताच्या कोपरांवर असावा. दृष्टी चवड्यांच्या टोकांवर स्थिर करावी किंवा डोळे मिटून उदरपोकळीकडे किंवा श्वासाकडे लक्ष द्यावे. हीच विपरीत करणीमुद्रेची अंतिम स्थिती होय.
श्वासस्थिती : खास लक्ष ठेवून श्वास रोखण्याची प्रवृत्ती टाळावी. नेहमीप्रमाणे श्वासोच्छ्वास चालू ठेवावा.
आवर्तने : सुरुवातीला 3 ते 5 श्वासांची 3 ते 5 आवर्तने करावीत. सरावानंतर आवर्तने कमी करून अंतिम स्थितीमध्ये जास्त काळ रहावे.
मुद्रा सोडताना : ज्या क्रमाने मुद्रेच्या अंतिम स्थितीमध्ये पोचलो, त्याच्या उलट्या क्रमाने हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यावे.
लाभ : रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने घडते. पायाच्या शिरा फुगण्याचा (Varicose Veins) त्रास कमी होतो. जठर, आतडी, यकृत, प्लीहा इ. अंगे खाली सरकण्यामुळे निर्माण झालेले अपचन, मंदाग्नी, बद्धकोष्ठता टाळता येतात, व हे अवयव पूर्व स्थितीमध्ये येण्यास मदत होते. वीर्यदोष टाळता येऊन लैंगिक जीवन आरोग्य संपन्न होते. मूळव्याध, गुदद्वारातील चीर, भगेंद्र इ. विकारात अश्विनीमुद्रेसहित ही मुद्रा नियमित अभ्यासण्यामुळे, उपचार म्हणून उपयोग होतो. अंतर्गळ (Hernia) टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून ही मुद्रा उपयुक्त ठरते. स्त्रियांसाठी ही मुद्रा विशेष करून उपयुक्त आहे. गर्भाशयभ्रंशची प्रकृती किंवा संभव या मुद्राभ्यासाने कमी होतो. स्वस्थ गर्भधारणा व सुलभ प्रसुतीकरता(Pre-natal) व प्रसुतीनंतर (Post-natal)  या मुद्रेचा सराव अत्यंत लाभदायक ठरतो.
अनेक योग ग्रंथातून मुद्रा व बंध यांची माहिती आली आहे. स्वामी स्वात्माराम यांनी लिहिलेल्या हठयोग प्रदीपिका या ग्रंथातून हठयोगातील काही मार्गदर्शक तत्वे आणि साधना एकत्र संकलित केल्या. हठयोग प्रदीपिकेचे त्यानी पाच मुख्य भाग केले आहेत. त्यात सर्वात जास्त १२६ श्लोक मुद्रा आणि बंध यासाठी आहेत. आसने आणि शुद्धीक्रिया यां द्वारे प्रथम शरीरशुद्धी करायची. त्यानंतर प्राणायामाने नाडीशोधन करायचे. मग मुद्रांद्वारे सुप्त कुंडलिनीला जागृत करायचे. शेवटी जागृत कुंडलिनीच्या मदतीने नादश्रवणाच्या अभ्यासाद्वारे समाधी साधायची असा मार्ग हठयोग प्रदीपिकेत सांगितला आहे.
अध्यात्मिक उन्नतीसाठी मुद्रा व बंध विशेष महत्वाचे मानले जातात. अनेक संतांनी यांचा उल्लेख केला आहे.
पानरंध्रद्वया माझारीं धनंजया पार्ष्णीं पिडूनियां कांवरुमूळ १०३६
आकुंचूनि अध देऊनि तिन्ही बंध करूनि एकवद वायुभेदी १०३७
कुंडलिनी जागवूनि मध्यमा विकाशूनि आधारादि भेदूनि आज्ञावरी १०३८ (ज्ञानेश्वरी/अध्याय अठरावा)
तेथ शुद्ध मुद्रा वज्रासन कां अंबुजासनही जाण अथवा घालावें सहजासन जे आसनीं मन सुखावे ४०९॥
तेणें मेरुदंड अवक्र शुद्ध समकाया राखोनि प्रसिद्ध मूळाधारादि तीनी बंध अतिसुबद्ध पैं द्यावे ॥४१०॥ (एकनाथी भागवत/अध्याय चौदावा)
येक सांगती मुद्रा च्यारी खेचरी भूचरी चाचरी अगोचरी येक आसनें परोपरी उपदेशिती २२॥ (दासबोध/दशक पांचवा समास चवथा : उपदेशलक्षण)
मुद्रा आणि बंध या योगशास्त्रामधील एका प्रमुख साधनेच्या उचित व नियमित सरावाने साधक ऐहिक व अध्यात्मिक लाभ प्राप्त करू शकतो.

संदर्भः "आरोग्यासाठी योग" - लेखकः पद्मश्री योगाचार्य श्री. सदाशिव निंबाळकर
"आसन प्राणायाम मुद्रा बंध" - लेखकः स्वामी सत्यानंद सरस्वती, बिहार योग विद्यालय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा