बुधवार, ५ मार्च, २०१४

योग व स्वास्थ्य Yog Swasty



योग व स्वास्थ्य
मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे फक्त रोगाचा अभाव नाही. तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिति अशी वर्ल्ड हेल्थ ऑरगानायझेशनने म्हणजे (WHO) ने स्वास्थ्याची व्याख्या केली आहे. स्वास्थ्य म्हणजे स्वस्मिन् तिष्ठतिस्वतःच्या ठिकाणी स्थिर होणे.
"स्वे स्थितः इति स्वस्थः।। ज्याचे चित्त "स्व' मध्येच राहते, तो स्वस्थ. अशा स्वस्थ व्यक्तीच्या स्थितीला स्वास्थ्य म्हटले जाते. आपले चित्त स्वभावतः "स्व'कडून इतरत्र जात असते. कोठूनही आवाज आला की आपण तिकडे लक्ष देऊ लागतो. एखादे आकर्षक दृश्‍य समोर आले की नजर तेथे खिळते. या झाल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी. शरीरात कोठे दुखलेखुपले, कंड सुटली, की आपले लक्ष शरीराच्या त्या त्या भागाकडे साहजिकपणे जाते. जी गोष्ट शरीराची, तीच मनाची. मनाविरुद्ध काही घडले, आपला अपमान झाला असे वाटले, तर त्याच विचाराने मन पुन्हा पुन्हा ग्रस्त होऊ लागते. आपले आर्थिक नुकसान झाले, प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, तर खेदाच्या भावनेचे उमाळे वारंवार येऊ लागतात. काही सामाजिक घटनांची स्मृती केवळ आपल्या नव्हे, तर नंतरच्या पिढ्यांत येत राहते. आपले शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक स्वास्थ्य बिघडले की आपण अस्वस्थ होतो.
शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनात्मक, राजकीय, तत्त्वचिंतनात्मक, सांस्कृतिक, आर्थिक, परिसरात्मक, आहाराबद्दल विकारातून मुक्तता येण्याबद्दल, विकारांचा प्रतिबंध करण्याबद्दल आणि आध्यात्मिक पैलू यांचा विचार स्वास्थ्यात केला जातो. सकस व संतुलित आहार, पुरेशा व्यायामाबरोबर योग्य विश्रांती आणि मनाची प्रसन्नता असेल तर स्वास्थ्य अनुभवता येईल. सकस व संतुलित आहार, पुरेशा व्यायामाबरोबर योग्य विश्रांती आणि मनाची प्रसन्नता या तीन गोष्टी स्वास्थ्यासाठी महत्वाच्या आहेत.
"समदोशः समग्निश्च, समधातु मलक्रियः प्रसंनात्मेंद्रियाम्नाह स्वस्थ इत्यामिधेयते (महर्षि सुश्रुत)
ज्या व्यक्ति चे दोष (वात-पित्त-कफ), अग्नि(जठराग्नि), धातु संतुलित आहेत आणि मल विसर्जन क्रिया योग्य आहे, ज्याचा आत्मा, इन्द्रिय आणि मन प्रसन्न आहेत, ती व्यक्ति पूर्णतया स्वस्थ आहे.
योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींनी मानवी जीवनाचं संतुलन राखलं जात. योग हे फक्त प्रतिबंधात्मक शास्त्र नसून रोग न होण्यासाठीही प्रतिबंध केला जातो. योग हा फक्त शरीराशी निगडीत नसून तो बराचसा मनाशीही निगडीत आहे. मानवी शरीर आणि मन यांची सांगड घालून मानवी जीवनाचा विकास केला जातो. योगाभ्यासाच्या जोडीने योग्य आहार आणि विहाराची गरज आहे. योगाभ्यासात प्राणायामालाही महत्त्व आहे. प्राणायामाच्या माध्यमातून मनावर ताबा ठेवता येतो. मनावर ताबा ठेवण्यासाठी आधी श्वासावर ताबा ठेवला पाहिजे. श्वासावर ताबा ठेवता आला की मनावर ताबा ठेवणं सोपं जातं. निरोगी आरोग्यासाठी आपलं मन प्रसन्न असण्याची आवश्यकता आहे.
प्रसन्न मन
प्रकृती स्वस्थ राहण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची प्रसन्नता ही होय. मन प्रसन्न ठेवणे ही प्रयत्नसाध्य स्थिती असते. स्वभावतः गत काळातील अप्रिय घटनांची स्मृती, सद्य परिस्थितीत करीत राहावी लागणारी तडजोड आणि भविष्यातील संभाव्य संकटांची चिंता यांच्या विराम मन गढून गेलेले असते. मनाची प्रसन्नता म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्‍यता नजीकच्या काळातच दृष्टोत्पत्तीस येणे, आपल्याला भूक लागली आहे आणि तयार जेवणाचा सुगंध येत आहे, असा अनुभव मन प्रसन्न करेल. आपल्या इच्छा, आपल्या तृष्णा आपल्या क्षमतेतील असतील, तरच हे शक्‍य आहे. "मला कोहिनूर हिरा हवा' अशी इच्छा जोपासली, तर ती पुरी होण्याची शक्‍यता नाही, हे स्पष्ट आहे. मला चांगले गुण मिळून मी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्याने चांगले परिश्रम केल्यास त्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्‍यता निश्‍चित आहे. आपले मन का प्रसन्न होत नाही याचा ज्याचा त्याने विचार केला पाहिजे. विचाराने माणूस वास्तव जाणू शकतो. आपल्या समंजसपणाने वास्तव स्वीकारू शकतो. स्वीकारलेले वास्तव किती चांगले आहे, असा दृष्टिकोन बाळगणारी व्यक्ती वास्तवाचा उपभोग घेऊ शकते. अशीच व्यक्ती मनाची प्रसन्नता कमावू शकते, टिकवू शकते. वास्तव जाणण्याकरता कष्टांचा; परंतु दीर्घ काळ फायदा देणारा मार्ग म्हणजे निरीक्षण करणे, त्यांची प्रामाणिकपणे नोंद ठेवणे, त्यातून निष्कर्ष काढणे, या निष्कर्षांची खात्री करण्यासाठी प्रयोग करणे, आपले निष्कर्ष विद्वान आणि अनुभवी प्रज्ञावंतांसमोर मांडून चर्चा करणे व स्थळ-काळाच्या मर्यादांना ओलांडणारेच निष्कर्ष "सत्य' म्हणून स्वीकारणे हा होय. याच मार्गाला आज विज्ञान म्हटले जाते. सोपा; परंतु निसरडा ठरण्याची शक्‍यता असणारा मार्ग म्हणजे श्रद्धा जोपासणे. जोपर्यंत आपले श्रद्धास्थान निवडताना आपण ते विचारपूर्वक डोळे उघडे ठेवून निवडतो, तोपर्यंत श्रद्धा ही एक मोठी शक्ती ठरते. श्रद्धास्थान निवडताना डोळे झाकून केवळ गतानुगतित्वाच्या न्यायाने आपण व्यवहार करतो, ती कर्मकांडे होत. ही श्रद्धा अंधश्रद्धा ठरण्याची शक्‍यता असते. सत्‌श्रद्धा माणसाला मनःशांती व मनोधैर्य देते. अंधश्रद्धा माणसाला संकटाच्या खाईत लोटते. आपल्या श्रद्धास्थानाबद्दल आदर अवश्‍य असावा, पण हटवादीपणा नसावा. आपण मानतो त्या श्रद्धास्थानाबद्दल आपल्या भावनांची कारणमीमांसा उघडपणे चर्चिता यावी; अन्यथा तो मूलतत्त्ववाद Fundamentalism होतो. इतिहास कदाचित असे सांगेल, की भौतिक प्राप्तीसाठी कष्टदायी विज्ञानाचा मार्ग श्रेष्ठ ठरेल, तर मनःशांतीसाठी श्रद्धेचा, धर्माचा मार्ग सोपा पडेल. दोन्ही मार्ग महत्त्वाचे असतात. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालता येणे हा मनाच्या प्रसन्नतेचा खरा मार्ग होय. 
शारीरिक स्वाथ्य प्राप्त करण्यासाठी आहार, विहार, विश्रांती आणि तर मानसिक स्वाथ्य प्राप्तीसाठी विकार, विचार, विवेक यांचे संतुलन राखावे लागते.


स्वास्थ्य हे ज्याचे त्याने कमवायचे असते. ते कोणाकडूनही दान म्हणून अथवा विकत घेता येत नाही. त्याकरता आजन्म अहोरात्र जागृत राहून प्रयत्न करावे लागतात. आपण तसा निर्धार करू या, की माझे स्वास्थ्य मीच मिळवले पाहिजे व ते मी मिळवणारच. 


संदर्भ:
आनंदयोग - श्रीकृष्ण व्यवहारे
आरोग्यासाठी योग – सदाशिव निंबाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा